Mamata Banerjee  Pudhari
राष्ट्रीय

Mamata Banerjee : एकीकडे पक्षात बंडाळी, दुसरीकडे निवासस्‍थानी CID!, ममता बॅनर्जींचा पाय खोलात

स्वाक्षरी प्रकरणाची चौकशी : पक्ष कार्यकर्त्यांच्या तीव्र विरोधानंतर सीआयडीच्या अधिकाऱ्यांच्या पथकाने केला निवासस्‍थानात प्रवेश

पुढारी वृत्तसेवा

Mamata Banerjee residence CID : आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्याच्या आरोपाप्रकरणी पश्चिम बंगाल पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) मंगळवारी (९ जून २०२६) माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या '३०बी, हरीश चॅटर्जी स्ट्रीट' येथील निवासस्थानी धडक दिली. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्या या निवासस्थानी झडती घेण्यासाठी सीआयडीचे अधिकारी पोहोचले होते, असे वृत्त 'एएनआय'ने दिले आहे

कार्यकर्त्यांसोबत काही वेळ झालेल्या जोरदार वादानंतर घरात प्रवेश

सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पत्त्याचा उल्लेख तृणमूल काँग्रेसचे पक्ष कार्यालय म्हणून केला जात असल्याने, त्यांना या परिसराची तपासणी करायची आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांसोबत काही वेळ झालेल्या जोरदार वादानंतर (स्टँडऑफ), अखेर सीआयडीच्या पथकाने घरात प्रवेश केला.

काय आहे प्रकरण?

विधानसभा अध्यक्षांकडे सादर करण्यात आलेल्या एका प्रस्तावावर तृणमूल काँग्रेसच्या (TMC) आमदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या केल्याचा आरोप आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रकरणी माहिती गोळा करण्यासाठी सीआयडीने काही दिवसांपूर्वीच नोटीस बजावली होती, त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांचा मोठा ताफा तृणमूलच्‍या कार्यालयात दाखल

स्वाक्षरीच्या कथित बनावटगिरी (Signature Forgery) प्रकरणाच्या तपासाचा भाग म्हणून मंगळवारी गुन्हे अन्वेषण विभागाचे (CID) एक पथक कोलकाता येथील पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी पोहोचले. राज्य तपास यंत्रणेचे अधिकारी, कालीघाट पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि महिला पोलिसांचा मोठा ताफा दुपारी उशिरा ३०बी हरीश चॅटर्जी स्ट्रीट येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात दाखल झाला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या सीआयडी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी एका नोटिसीला दिलेल्या उत्तराच्या आधारे हा शोध घेतला जात आहे, असे वृत्त 'पीटीआय' या वृत्तसंस्थेने दिले आहे.

अभिषेत बॅनर्जी यांना समन्‍स

"अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या उत्तरात म्हटले होते की, आमदारांच्या स्वाक्षऱ्या ३०बी हरीश चॅटर्जी स्ट्रीट येथील पक्षाच्या केंद्रीय कार्यालयात गोळा करण्यात आल्या होत्या. त्यांच्या याच विधानाच्या आधारे आम्ही तपासाचा भाग म्हणून येथे आलो आहोत," अशी माहिती एका सीआयडी अधिकाऱ्याने दिली. दरम्‍यान, ममता बॅनर्जी यांच्यासोबत सध्या नवी दिल्लीत असलेले अभिषेक बॅनर्जी यांना सीआयडीने याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहे.

सुरुवातीला पोलिसांना रोखले, नंतर मोठा फौजफाटा दाखल

तपास पथक जेव्हा सुरुवातीला परिसरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा त्यांना सुरक्षा रक्षकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. टीएमसी नेते आणि माजी खासदार शुभाशीष चक्रवर्ती यांनी आधीच स्पष्ट केले होते की, अभिषेक बॅनर्जी यांच्या अनुपस्थितीत पक्ष कोणतीही झडती घेऊ देणार नाही."अभिषेक बॅनर्जी यांच्या अनुपस्थितीत आम्ही सीआयडीला आवारात प्रवेश करू दिला नाही. ते परत आल्यावर सीआयडी घराची झडती घेऊ शकते," असे चक्रवर्ती यांनी माध्‍यमांशी बोलताना सांगितले. मात्र काही वेळानंतर सीआयडीचे पथक मोठ्या पोलीस फौजफाट्यासह परतले आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या 'सौम्य विरोधा'ला न जुमानता त्यांनी आवारात प्रवेश केला. कालीघाट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि कोलकता पोलिसांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांशी त्यांचा वाद झाला. अधिकाऱ्यांनी त्यांना तपास कार्यात अडथळा न आणण्याच्या सूचना दिल्याचे समजते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयडीच्या पथकाने निवासस्थान आणि कार्यालय असलेल्या या परिसरात प्रवेश करून तपास आणि पडताळणीची प्रक्रिया सुरू केली.दरम्यान, या तपासाचाच एक भाग म्हणून सीआयडीच्या दुसऱ्या पथकाने कॅमॅक स्ट्रीटवरील अभिषेक बॅनर्जी यांच्या कार्यालयालाही भेट दिली.

तृणमूल काँग्रेसच्या २८ वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठे संकट

या कारवाईमुळे कथित खोट्या स्वाक्षरी प्रकरणाला एक नवे वळण मिळाले असून, टीएमसीच्या २८ वर्षांच्या इतिहासातील हे सर्वात मोठे अंतर्गत संकट मानले जात आहे. वरिष्ठ टीएमसी आमदार शोभनदेब चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून मान्यता देण्यासाठी अध्यक्षांकडे पाठवलेल्या प्रस्तावात अनेक आमदारांच्या खोट्या स्वाक्षऱ्या असल्याचा आरोप झाल्यानंतर हा वाद सुरू झाला. या आरोपांनंतर गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आणि सीआयडीकडे तपास सोपवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT