शुभेंदु अधिकारी 
राष्ट्रीय

West Bangal election |प. बंगालच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत शुभेंदु अधिकारी अग्रस्थानी, महिला नेत्यांची नावाची देखील चर्चा

रूपा गांगुली आणि अग्नीमित्रा पॉल या महिला नेत्यांच्या नावाची देखील चर्चा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील ऐतिहासिक विजयानंतर भाजप आता कोणाला मुख्यमंत्री करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सत्ता आल्यानंतर भाजप बंगाली नेत्यालाच मुख्यमंत्री करेल, असे गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणूक प्रचारात वेळोवेळी सांगितले. याबरोबरच बंगालचा पुढील मुख्यमंत्री मांसाहारी असेल असे केंद्रीय मंत्री सुकांता मुजुमदार यांनी म्हटले. यामुळे शुभेंदु अधिकारी, दिलीप घोष, समिक भट्टाचार्य यांच्या नावाची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी सुरू आहे. तर भाजपच्या महिला आरक्षणाच्या धोरणाला लक्षात घेता रूपा गांगुली आणि अग्नीमित्रा पॉल या महिला नेत्यांच्या नावाची देखील चर्चा आहे. 

मुख्यमंत्री पदाच्या या शर्यतीत शुभेंदु अधिकारी अग्रस्थानी असल्याचे मानले जाते. एकेकाळीच्या ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय राहिलेले शुभेंदु अधिकारी आता त्यांचे सर्वात मोठे विरोधक आहेत. २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांचा पराभव करत जायंट किलर असल्याचे दाखवून दिले. भाजपने त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवली. यामुळे त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडू शकते. 

दिलीप घोष आणि समिक भट्टाचार्य 

२०२१ मध्ये भाजपला मजबूत विरोधी पक्ष म्हणून उभारी देण्यास माजी प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांची मोठी भूमिका राहिली. आज ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष नसले तरीही त्यांचा प्रभाव राज्यात कायम आहे. यामुळे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत ते देखील एक चांगला पर्याय मानले जात आहेत. याबरोबर पक्षाचे वर्तमान प्रदेशाध्यक्ष समिक भट्टाचार्य यांना मनमिळाऊ नेता म्हणून ओळखले जाते. पक्षातील सर्वांना सोबत घेऊन चालणारे म्हणून त्यांची ओळख आहे. पडद्याच्या पाठीमागे राहून पक्षाची संघटना मजबूत करण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली आहे. यामुळे त्यांना देखील मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत दावेदार मानले जाते. 

'या' महिला नेत्यांची नावे चर्चेत

पश्चिम बंगालमधील मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्याचा विचार करताना भाजपच्या महिला आरक्षणाच्या धोरणाला देखील लक्षात घ्यावे लागेल. जर भाजपने महिला नेत्याला मुख्यमंत्री करायचे ठरवले तर त्यांच्याकडे रूपा गांगुली आणि अग्नीमित्रा पॉल यासारख्या नेत्यांचे विकल्प आहेत. पॉल यांनी आसनसोल दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला. तर माजी राज्यसभा खासदार राहिलेल्या रूपा गांगुली यांची लोकप्रियता चांगली आहे. त्यांनी देखील सोनारपूर दक्षिण मतदार संघातून विजय मिळवला आहे. याव्यतिरिक्त भाजपच्या धक्का तंत्राचा विचार करता एखाद्या नवीन नावाला देखील संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT