नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
देशातील टॉप 100 श्रीमंतांची संपत्ती यावर्षी प्रथमच 90 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे. एका वर्षात त्यांची संपत्ती 40टक्क्यांपेक्षा जास्त वाढून 93.64 लाख कोटींवर गेली आहे. 2020 च्या तुलनेत त्यांची संपत्ती दुपटीने वाढली आहे. 2023 च्या तुलनेत त्यांची एकूण संपत्ती 26.50 लाख कोटींनी वाढली आहे. विशेष म्हणजे, या वर्षी 100 श्रीमंत भारतीयांच्या संपत्तीत झालेली वाढ त्यांच्या व्यवसायातून नफा वाढण्यापेक्षा शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमुळे वाढली आहे. एका वर्षात सेन्सेक्स सुमारे 30 टक्के वाढला आहे. ‘फोर्ब्स’च्या ‘इंडियाज 100 रिचेस्ट 2024’च्या अहवालानुसार टॉप-100 मध्ये 80 टक्क्यांपेक्षा जास्त श्रीमंत भारतीय पूर्वीपेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. त्यापैकी 58 लोकांच्या संपत्तीत 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 8,397 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे देशातील दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. एका वर्षात त्यांची संपत्ती 4 लाख कोटी रुपयांनी वाढून 97.41 लाख कोटी झाली. ओपी जिंदाल ग्रुपच्या प्रमुख सावित्री जिंदाल तिसर्या क्रमांकावर पोहोचल्या. त्यांची संपत्ती एका वर्षात 82 टक्क्यांनी वाढून 3.67 लाख कोटी रुपये झाली आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि एमडी मुकेश अंबानी या वर्षीही देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती राहिले आहेत. एका वर्षात त्यांची संपत्ती 2.3 लाख कोटी रुपयांनी वाढून 10 लाख कोटींहून अधिक झाली. ते जगातील 13 व्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. एका वर्षात संपत्ती वाढवण्यात ते दुसर्या स्थानावर आहेत.