ICC Men's T20 World Cup 2024
अत्‍यंत रोमहर्षक सामन्‍यात आज टीम इंडियाने आज टी-20 विश्‍वचषकावर आपली मोहर उमटवली. 
राष्ट्रीय

आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे

पुढारी वृत्तसेवा

अत्‍यंत रोमहर्षक सामन्‍यात आज टीम इंडियाने आज टी-20 विश्‍वचषकावर आपली मोहर उमटवली. या ऐतिहासिक विजयाने देशभरात जल्‍लोष सुरु झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही टीम इडियाचे अभिनंदन केले आहे.

आमच्‍या संघाने टी-20 विश्‍वचषक स्‍टाइलमध्‍ये घरी आणला आहे. आम्हाला भारतीय क्रिकेट संघाचा अभिमान आहे, अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे अभिनंदन केले आहे.

टीम इंडियाची स्‍वप्‍नवत कामगिरी

प्रथम फलंदाजी करताना भारताच्‍या डावाची सुरुवात खराब झाली. टीम इंडियाने 34 धावांत कर्णधार रोहित (9), ऋषभ पंत (0) आणि सूर्यकुमार (3) यांच्या विकेट्स गमावल्या होत्या. यानंतर भारतीय संघाला कठीण परिस्थितीत एका संयमी खेळीची गरज होती. विराटने ही गरज ओळखली. त्‍याने अक्षर पटेलच्या साथीने 54 चेंडूत 72 धावांची भागीदारी केली. विराट कोहलीच्या 76 धावा आणि अक्षर पटेलच्या 47 धावांच्या झंझावाती खेळीमुळे भारताने 20 षटकात 7 विकेट गमावत 176 धावा केल्या. 16 षटकांत दक्षिण आफ्रिकेने चार गड्यांच्या मोबदल्यात 151 धावा केल्या होत्या. त्यानंतर मिलर आणि क्लासेन क्रीजवर होते.

भारताने 17व्या षटकात सामन्याचे चित्र बदलले

दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या 24 चेंडूत 26 धावांची गरज होती. यानंतर 17व्या षटकात हार्दिकने क्लासेनला बाद करत केवळ चार धावा दिल्या. 18व्या षटकात बुमराहने यानसेनला बाद करत दोन धावा दिल्या. अर्शदीपने १९व्या षटकात चार धावा दिल्या. दक्षिण आफ्रिकेला शेवटच्या षटकात 16 धावांची गरज होती. हार्दिकने पहिल्याच चेंडूवर मिलरला बाद केले. दुसऱ्या चेंडूवर रबाडाने चार धावा केल्या. रबाडाने तिसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. महाराजांनी चौथ्या चेंडूवर एक धाव घेतली. त्याचा पुढचा चेंडू वाईड होता. हार्दिकने पाचव्या चेंडूवर रबाडाला बाद केले. दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत आठ गडी गमावून 169 धावा करता आल्या. 16 व्‍या षटकापर्यंत सामना पूर्णपणे दक्षिण आफ्रिकेच्‍या हातात होता. मात्र फलंदाजांनी मोक्‍याची क्षणी अवसानघातकी फटके मारले. भारताने दक्षिण आफ्रिकेचा जगज्‍जेता होण्‍याचा घास हिरावला. या विजयासह भारताचा 11 वर्षांचा ICC ट्रॉफीचा दुष्काळ संपला. भारताने यापूर्वी 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्याचबरोबर भारताने 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषक जिंकला आहे. 13 वर्षांनंतर कोणीही विश्वचषक जिंकू शकलेले नाही. 2011 मध्ये भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.

SCROLL FOR NEXT