वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या ३४४ वर Pudhari Photo
राष्ट्रीय

Wayanad Landslide Updates : वायनाड भूस्खलनातील मृतांची संख्या ३४४ वर

अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी केले बचाव पथकाचे कौतुक

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळच्या वायनाडमध्ये (Wayanad Landslide Updates) मुसळधार पावसानंतर झालेल्या भूस्खलनात मृतांची संख्या ३४४ वर पोहोचली आहे. १०० लोकांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दुर्घटनेला ४ दिवस उलटले असले, तरी अद्याप २०० हून जण बेपत्ता आहेत. यातील कुणी जिवंत असेल, याची शक्यता कमीच असल्याचे सांगण्यात येते. १०५ मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

चौथ्या दिवशी एक कुटूंब जिवंत सापडले

 वायनाड दुर्घटनेमधील मृतांचा आकडा ३४४ वर गेला आहे. १०० लोकांवर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. दुर्घटनेला ४ दिवस उलटले असले, तरी अद्याप २०० हून जण बेपत्ता आहेत. दरम्यान घटनेच्या चौथ्या दिवशी मातीच्या ढिगार्याखाली सापडलेले कुटूंब जिवंत सापडले.

वायनाड भूस्खलन : अद्याप २०० हून अधिक बेपत्ता

भूस्खलनाचे कारण काय?

वायनाड हे केरळमधील एकमेव पठारी क्षेत्र पश्चिम घाटात ७०० ते २,१०० मीटर उंचीवर हे पठार आहे. वायनाडची ५१ टक्के जमीन डोंगर उताराची आहे. अरबी समुद्रातून मान्सून आधी पश्चिम घाटावर आदळतो. त्यामुळे या भागात खूप जास्त पाऊस पडतो. काबिनी नदीची उपनदी मनंथवाडी ही ठोंडारमुडी शिखरावरून उगम पावते. ठोंडारमुडीला पूर आल्याने यावेळी मोठे नुकसान झाले.दरम्यान, हवामान बदल आणि पर्यावरणाकडे दुर्लक्ष केल्यामुळे वायनाडमध्ये विनाशकारी भूस्खलन झाले, असे अभ्यासात आढळून आले आहे.

भूस्खलनाचे कारण काय?

एनएसएस १५०, तर काँग्रेस १०० घरे बांधणार

वायनाड दुर्घटनेतील (Wayanad Landslide Updates) घरे मातीखाली गेलेल्या लोकांना राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे १५० घरे बांधून देण्यात येणार आहेत, असे केरळच्या उच्चशिक्षणमंत्री आर. बिंदू यांनी सांगितले. त्याचबरोबर काँग्रेसतर्फे पीडितांसाठी १०० घरे बांधून देण्यात येतील, असे काँग्रेसचे नेते तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जाहीर केले आहे.

शोधासाठी ड्रोन सिस्टीम

वायनाड दुर्घटनेत अतोनात नुकसान झाले आहे. घरेच्याघरे मातीखाली गेली आहेत. लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी भारतीय हवाईदलाच्या हिंडन तळावरून लवकरच वायनाडला सी-१३० विमान दाखल होईल. हे विमान विशेष ड्रोन सिस्टीमने सज्ज असून, त्यासह तज्ज्ञांचे एक पथकही असेल, ओल्या मातीच्या अडकलेल्यांचा नेमका ठावठिकाणा त्यामुळे कळेल.

महसूलमंत्री के. राजन यांनी सांगितले, ९१ मदत छावण्या उभारल्या असून, तेथे ९ हजार ३२८ लोक या मदत छावण्यांमध्ये आहेत. पर्यटन मंत्री पी ए मोहम्मद रियास म्हणाले, या दुर्घटनेत सापडलेल्या लोकांना वाचवण्यासाठी सुमारे १,३७४ बचाव कर्मचारी आहेत.

वायनाड भूस्खलन : अडकलेल्यांना वाचविण्यासह मृतदेहांचा शोध सुरूच आहे.

वारस नसलेल्या मृतदेहांवर प्रचलित संकेतांनुसार अंत्यसंस्कार

श्वानपथके ढिगाऱ्यांखाली दबलेल्या मृतदेहांच्या शोधात मदत करत आहेत. लष्करी श्वानांनी पॉईंट आऊट केलेल्या जागांवर बचाव पथकांकडून विशेष भर देण्यात येतो. ढिगाऱ्यांखाली मृतदेहच आता सापडत आहेत. एकुणातील परिस्थिती पाहता बेपत्ता असलेल्यापैकी कुणी जिवंत असण्याची शक्यता कमीच आहे, असे बचाव पथकाकडून सांगण्यात आले. वारस नसलेल्या मृतदेहांवर प्रचलित संकेतांनुसार अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. शुक्रवारीही (दि.२) पाऊस सुरूच होता. भर पावसातही मृतदेहांचा शोध सुरुब होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT