पुढारी ऑनलाईन डेस्क : केरळमधील वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात साेमवारी मध्यरात्री भूस्खलन झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे आतापर्यंत ९३ जणांचा मृत्यू झाला आहे तर १२८ जण जखमी आहेत, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी दिली. दरम्यान, भूस्खलनानंतर मातीच्या ढिगाऱ्याखाली शेकडो लोक तिथे अडकल्याची भीती आहे. लष्करासह-एनडीआरएफचे मदतकार्य सुरु असून, पावसाचा जोर कायम असल्याने मदतकार्यात अडथळे येत आहेत. (Wayanad landslide )
वायनाडमधील भूस्खलनाबाबत केरळचे मुख्य सचिव डॉ. व्ही. वेणू यांनी सांगितले की, 'परिस्थिती अजूनही गंभीर आहे. अजूनही बरेच लोक बेपत्ता आहेत. त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची भीती आहे. मदत पथकातील एक टीम नदी ओलांडण्यात यशस्वी झाली आहे; परंतु आम्हाला मदत देण्यासाठी आणि नदीच्या पलीकडे बचाव कार्य सुरू करण्यासाठी आम्हाला तेथे पोहोचावे लागेल. आज आणि उद्या या परिसरात पावसाचा रेड अलर्ट आहे. त्यामुळे हेलिकॉप्टर उडू शकत नाहीत. एनडीआरएफ पूर्ण क्षमतेने मदतकार्य करत आहे. भारतीय लष्करही मदतीला आहे.
भूस्खलनाचा सर्वाधिक फटका मुंडक्काई, चूरलमला, अट्टामला आणि नूलपुझा या गावांना बसला आहे. चाळीयार नदीत अनेक जण वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. भारतीय लष्कराने आपल्या निवेदनात म्हटलं आहे की, नैसर्गिक आपत्तीस्थळी वैद्यकीय पथकांसह 225 कर्मचारी तैनात केले आहेत. हवाई दलाची दोन हेलिकॉप्टर, एक Mi-17 आणि एक ALH (Advanced Light Helicopter) देखील सेवेत दाखल झाली आहेत.
केरळच्या मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, भारतीय नौदलाचे एक पथकही बचाव कार्यात मदत करेल. जिल्ह्य़ातील एक पूल जो बाधित भागांना जवळच्या चोरलमाला शहराशी जोडणारा होता, तोही वाहून गेला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्याशी चर्चा केली. नैसर्गिक आपत्तीत केरळला संकटाचा सामना करण्यासाठी केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पंतप्रधान कार्यालयाने भूस्खलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 2 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
केरळमध्ये नैऋत्य मान्सूनचा जोर वाढला असून, भारतीय हवामान खात्याने मध्य आणि उत्तर केरळमध्ये पुढील २४ तासांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. सोमवारी केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, ज्यामुळे अनेक भागात मोठी जीवितहानी आणि गंभीर नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. दिवसभर संततधार पाऊस आणि जोरदार वाऱ्याचा परिणाम वायनाड आणि कोझिकोड या उत्तरेकडील जिल्ह्यांवर झाला. वायनाड जिल्ह्यातील मेप्पडीजवळील डोंगराळ भागात सोमवारी मध्यरात्री भूस्खलन झाले. अनेक घरे मातीच्या ढिगाऱ्याखाली गाढली गेली. मध्यरात्री २ वाजता आणि पुन्हा पहाटे चार वाजता, असे दोनवेळा भूस्खलन झाले.
चुरलमाला येथील जखमी झालेल्या एका वृद्धाने एका वृत्तवाहिनीला सांगितले की, त्याची पत्नी बेपत्ता आहे आणि ती कुठे आहे हे त्यांना माहीत नाही. ते म्हणाले की आम्ही घरात झोपलो होतो. अचानक मोठा आवाज झाला आणि अचानक आमच्या घराच्या छतावर मोठमोठे दगड आणि झाडे पडू लागली. सर्व दरवाजे तोडून पुराचे पाणी घरात शिरले. मला कोणीतरी वाचवले आणि रुग्णालयात नेले, पण माझ्या पत्नीबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही.
चुरलमला येथील आणखी एका रहिवाशाने सांगितले की, 'जमीन अजूनही थरथरत आहे. काय करावे हे समजत नाही. इथे खूप गोंगाट आहे. येथून यायला मार्ग नाही. आम्हाला वाचवा,' अशी विनंती ते करत होते. विलांगडू बाजूला दरड कोसळल्याने मलंगडू पूल वाहून गेला. चार घरांचे नुकसान झाले असून, पूल वाहून गेल्याने १२ कुटुंबे अडकून पडली आहेत, तर एक व्यक्ती बेपत्ता असल्याचे वडकारा येथील काँग्रेस खासदार शफी पारंबिल यांनी सांगितले. मुंडक्काई, चूरलमला, अट्टामाला आणि नूलपुझा ही गावे भूस्खलनामुळे प्रभावित भागात आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्हा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक कुटुंबांना विविध छावण्यांमध्ये किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या घरी हलवण्यात आले आहे.
भूस्खलन आणि पावसामुळे चुरमला भागात इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एनडीआरएफ, अग्निशमन, पोलीस आणि महसूल विभागाचे पथक बचावकार्य करत आहे. आतापर्यंत सुमारे २५० जणांना वाचवण्यात यश आले आहे. केरळ सरकारने मदतीसाठी भारतीय लष्कराच्या १२२ इन्फंट्री बटालियन (TA) मद्रासच्या बचाव पथकाची मागणी केली आहे. एक वैद्यकीय अधिकारी, दोन जेसीओ आणि ४० सैनिकांसह एक पथक बचाव कार्यात मदत करण्यासाठी तयार करण्यात आले आहे.