Waqf Amendment Bill 2025: Pudhari
राष्ट्रीय

'वक्फ'कडे 1.2 लाख कोटींची 9.4 लाख एकर जमिन; जाणून घ्या 'वक्फ'विषयी सर्वकाही एका क्लिकवर

Waqf Bill 2025: वक्फ बोर्ड हा रेल्वे आणि सैन्य दलानंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जमिन मालक

Akshay Nirmale

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्रीय अल्पसंख्यांक व्यवहार मंत्री किरन रिजिजू यांनी आज 2 एप्रिल 2025 रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरोप-प्रत्यारोपास सुरवात झाली आहे.

या पार्श्वभुमीवर नेमके वक्फ म्हणजे काय? वक्फ बोर्डाकडे किती जमिन आहे? आणि वक्फबाबतची इतर माहिती एका क्लिकवर जाणून घेऊया...

वक्फ म्हणजे काय?

वक्फ या शब्दाचे मूळ अरबी भाषेत आहे. अरबी शब्द वकाफा मधून हा शब्द आला आहे. त्याचा अर्थ थांबवणे, सामावून घेणे, जतन करणे असा होतो. मुस्लिम कायद्यानुसार वक्फ म्हणजे कायमस्वरूपी धार्मिक, पवित्र किंवा धर्मादाय हेतूसाठी समर्पित केलेली स्थावर किंवा जंगम मालमत्ता.

एखादी मालमत्ता वक्फ म्हणून जाहिर केली की ती विकता येत नाही, तिचे हस्तांतरण करता येत नाही आणि इस्लामच्या तत्वांनुसार त्या मालमत्तेचा वापर केवळ समुदायाच्या कल्याणासाठी करता येतो.

वक्फ अधिनियम 1995 मध्ये म्हटले आहे की, वक्फ म्हणजे "इस्लाममध्ये धार्मिक, पवित्र किंवा धर्मादाय हेतूसाठी समर्पित केलेली स्थावर किंवा जंगम मालमत्ता.

वक्फ मालमत्ता कोणत्या असतात?

वक्फ मालमत्ता इस्लाम धर्माच्या अनुयायांनी दान केलेल्या असतात आणि समाजातील सदस्य त्यांचे व्यवस्थापन करतात. प्रत्येक राज्यात वक्फ मंडळ (वक्फ बोर्ड) असते.

ही एक कायदेशीर संस्था आहे आणि त्याला मालमत्ता मिळवण्याचा, ठेवण्याचा आणि हस्तांतरित करण्याचा अधिकार असतो. वक्फच्या मालमत्तांची विक्री किंवा कायमस्वरूपी भाडेपट्टी दिली जाऊ शकत नाही. भारतात एकूण 30 वक्फ मंडळे आहेत.

वक्फ मालमत्तांचे प्रकार

वक्फ मालमत्तांमध्ये मुख्यतः शेती, जमीन, इमारती, दर्गा / मजार आणि कब्रस्तान, ईदगाह, खानकाह, मदरसे, मशिदी, प्लॉट्स, तळी, शाळा, दुकाने, विविध संस्था या मालमत्तांचा समावेश होतो.

भारतामध्ये वक्फ बोर्डकडे किती जमिन आहे?

वक्फ बोर्डकडे देशभरात 8.7 लाख मालमत्ता असून ती सगळी मिळून एकूण 9.4 लाख एकर जमिन आहे. या जमिनीचे नियंत्रण आणि व्यवस्थापन वक्फ बोर्डकडे आहे.

या जमिनीची अंदाजे किंमत 1.2 लाख कोटी इतकी होते. यामुळे वक्फ बोर्ड हा भारतीय रेल्वे आणि भारतीय सैन्य दलानंतर देशातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जमिन मालक आहे.

वक्फ सुधारणा विधेयकात काय म्हटले आहे?

वक्फ अधिनियम 1995 मध्ये सुधारणा करण्यासाठी आणलेल्या विधेयकानुसार, वक्फ मंडळांना त्यांच्या मालमत्तांची नोंदणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करणे बंधनकारक होणार आहे, जेणेकरून त्यांचे योग्य मूल्यांकन होईल.

सध्या, बहुतेक वक्फ मंडळांवर सदस्य निवडून येतात, पण नवीन कायद्यामुळे सर्व सदस्य सरकारकडून नियुक्त केले जातील.

त्यामुळे सत्ताधारी वक्फवर पूर्ण नियंत्रण मिळवू शकतात अशी भीती व्यक्त केली जात आहे. नव्या विधेयकानुसार, वक्फ मंडळाचा मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मुस्लिम नसला तरी चालेल आणि दोन सदस्य अनिवार्यपणे मुस्लिम नसतील, अशी तरतूद आहे.

वक्फ मालमत्तेबाबत हजारो प्रकरणे न्यायालयात प्रलंबित

सरकारच्या मते, सध्या वक्फ ट्रिब्युनल्समध्ये 40 हजार 951 प्रकरणे प्रलंबित आहेत. वक्फ बोर्ड किंवा वक्फ मालमत्तेशी संबंधित वाद सोडवण्यासाठी अर्ध-न्यायिक संस्था आहेत. त्यातील 9942 प्रकरणे मुस्लिम समाजाने वक्फ व्यवस्थापन संस्थांविरुद्ध दाखल केलेली आहेत.

वक्फ मंडळ कोणत्या प्रकारच्या न्यायालयीन प्रकरणांना सामोरे जाते?

मालमत्ता व्यवस्थापन, कायदेशीर वाद, महिला प्रतिनिधित्व, आणि सुधारणा करण्याची आवश्यकता यावरून वर्षानुवर्षे वक्फ मंडळाने विविध समस्यांना तोंड दिले आहे.

वक्फ मालमत्तेची नोंदणी आणि व्यवस्थापन कसे केले जाते?

भारतामधील वक्फ मालमत्ता या वक्फ अधिनियम 1995 अंतर्गत नियंत्रित केल्या जातात. एक सर्वेक्षण आयुक्त वक्फ म्हणून घोषित केलेल्या सर्व मालमत्तांची यादी तयार करतो.

यासाठी तो स्थानिक चौकशी करतो, साक्षीदारांना बोलावतो आणि सार्वजनिक दस्तऐवज मागवतो. वक्फ मालमत्ता "मुतवल्ली" या व्यवस्थापकाद्वारे पाहिली जाते.

वक्फ मंडळाच्या ट्रिब्युनल्सच्या निर्णयांना उच्च न्यायालयात आव्हान देता येते का?

वक्फ ट्रिब्युनलने दिलेल्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देता येते. उच्च न्यायालय ट्रिब्युनलच्या निर्णयाला दुजोरा देऊ शकते, तो बदलू शकते किंवा पलटवू शकते.

वक्फ मंडळ कोणतीही मालमत्ता वक्फ म्हणून घोषित करू शकते का?

नाही. वक्फ म्हणजे एखाद्या व्यक्तीने मुस्लिम कायद्यानुसार धार्मिक, पवित्र किंवा धर्मादाय हेतूसाठी जंगम किंवा स्थावर मालमत्ता कायमस्वरूपी अर्पण करणे.

ज्या मालमत्ता धार्मिक किंवा सामाजिक कार्यासाठी दान दिल्या आहेत पण त्या उद्देशाने वापरल्या जात नाहीत, अशा मालमत्तांचा वक्फमध्ये समावेश असू शकतो.

वक्फ मंडळ कायद्याच्या कलम 40 अंतर्गत कोणतीही मालमत्ता स्वतःच्या मालकीची घोषित करू शकते का?

वक्फ मंडळ इस्लाम धर्माच्या अनुयायांनी धार्मिक कार्यासाठी दान केलेल्या मालमत्तेवर दावा करू शकते. मात्र, कोणतीही खाजगी मालमत्ता थेट वक्फ म्हणून घोषित करण्याचा या कायद्यात उल्लेख नाही.

वक्फ सुधारणा विधेयकाची टाईमलाईन

  • ऑगस्ट 2023 मध्ये हे विधेयक लोकसभेत सादर करण्यात आले. त्यावेळी विरोधकांनी विरोध करत ते "अत्याचारी" असल्याचे म्हटले. दुसऱ्याच दिवशी हे विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात आले. त्याचा अहवाल फेब्रुवारीत सादर झाला.

  • विरोधी खासदारांनी आपले मत डावलल्याचा आरोप केला, मात्र भाजपने हे दावे फेटाळले. समितीच्या सदस्य आणि भाजप खासदार अपराजिता सारंगी यांनी सांगितले की, "अध्यक्षांनी सर्वांचे मत ऐकण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना पुरेसा वेळ दिला."

  • JPC ने सहा महिन्यांत जवळपास 36 बैठकांचे आयोजन केले, पण त्यापैकी अनेक गोंधळातच संपल्या. एका बैठकीत तृणमूलचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी टेबलवर काचेची बाटली फोडली होती.

  • अखेर 66 बदल सुचवण्यात आले, त्यापैकी विरोधकांचे 44 प्रस्ताव फेटाळले गेले, तर भाजप व मित्रपक्षांचे 23 प्रस्ताव स्वीकारण्यात आले. त्यापैकी 14 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.

  • विरोधकांच्या असहमती नोंदी हटवण्यावरूनही वाद निर्माण झाला. सरकारने सांगितले की, अध्यक्षांना हा निर्णय घेण्याचा अधिकार आहे, पण चर्चेनंतर त्या नोंदी परत समाविष्ट करण्यात आल्या.

  • मूळ वक्फ दुरुस्ती विधेयकात 44 बदल प्रस्तावित होते. त्यामध्ये प्रत्येक वक्फ बोर्डात किमान दोन महिलांसह गैर-मुस्लिम सदस्यांची निवड करण्याची तरतूद, तसेच एक केंद्रीय मंत्री, तीन खासदार आणि 'राष्ट्रीय ख्यातीचे' व्यक्ती सदस्य म्हणून असावेत, असा प्रस्ताव होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT