नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा- संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केल्यानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयक राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आले आहे. राष्ट्रपतींनी मंजुरी दिल्यानंतर राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. राजपत्र अधिसूचना जारी होताच हा कायदा संपूर्ण देशात लागू होईल. तथापि, संबंधित मंत्रालयांच्या शिफारशींसह नंतर या कायद्यात आणखी उप-नियम जोडले जातील. संसदेच्या शिफारशीनुसार, कायदा मंजूर झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सरकारला कायद्यातील नियम बनवावे लागतात. या विधेयकाचे कायद्यात रुपांतर करण्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया सरकार लवकरच पूर्ण करेल. त्यामुळे वक्फ दुरुस्ती विधेयकाचे पुढील आठवड्यात कायद्यात रुपांतर होईल, असे मानले जात आहे.
बुधवारी, लोकसभेत मंजूर झाल्यानंतर, गुरुवारी रात्री उशिरा राज्यसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक मंजूर झाले. राज्यसभा सचिवालयाने हे विधेयक कायदेशीर अंमलबजावणीसाठी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाकडे परत पाठवले. अल्पसंख्याक मंत्रालयाने आता हे विधेयक कायदेशीर स्वरूप देण्यासाठी राष्ट्रपतींकडे पाठवले आहे. राष्ट्रपतींना या विधेयकावर स्वाक्षरी करावी लागेल. जर राष्ट्रपतींची इच्छा असेल तर त्या विधेयक परत देखील पाठवू शकतात. जर राष्ट्रपतींनी ते पुनर्विचारासाठी परत पाठवले तर संसद त्यात सुधारणा करू शकते किंवा जसे आहे तसे परत पाठवू शकते. जर ते पुन्हा विधेयक राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आले तर राष्ट्रपतींना त्यावर स्वाक्षरी करणे अनिवार्य असते. याशिवाय, राष्ट्रपतींना या विधेयकावर कोणताही निर्णय न घेण्याचा अधिकारही असतो. याला ‘जेबी वीटो’असे म्हणतात. यासाठी कोणतीही वेळ मर्यादा निश्चित केलेली नसते. जर राष्ट्रपतींची इच्छा असेल तर ते विधेयक अनिश्चित काळासाठी त्यांच्याकडे ठेवू शकतात.
राष्ट्रपतींच्या संमतीनंतरच विधेयक कायदा म्हणून अधिसूचित केले जाते. राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर, या विधेयकाला कायदेशीर मान्यता मिळते आणि ते कायद्याच्या रूपात संपूर्ण देशात लागू मानले जाते. राजपत्र अधिसूचनेनंतर, सरकार त्यात केलेल्या तरतुदींनुसार काम करण्यास सुरुवात करते.