नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : वक्फ बोर्ड विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत आज (दि. २४) राडा झाला. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांसह १० विरोधी पक्षाच्या खासदारांचे समितीच्या सदस्य पदावरून एक दिवसासाठी निलंबन करण्यात आले आहे. तर ही बैठक २७ जानेवारीपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. (JPC on Waqf Amendment Bill)
या बैठकीत तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यात जोरदार वादावादी झाली. परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे पाहून १० खासदारांचे समितीच्या सदस्य पदावरून निलंबन करण्यात आले.
बैठकीत झालेल्या गोंधळानंतर, वक्फ दुरुस्ती विधेयक २०२४ वरील संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीतून सर्व १० विरोधी खासदारांना दिवसभरासाठी निलंबित करण्यात आले आहे. निलंबित करण्यात आलेल्या विरोधी खासदारांमध्ये कल्याण बॅनर्जी, मोहम्मद जावेद, ए राजा, असदुद्दीन ओवैसी, नासिर हुसेन, मोहिबुल्लाह, एम. अब्दुल्ला, अरविंद सावंत, नदीमुल हक, इम्रान मसूद यांचा समावेश आहे. (JPC on Waqf Amendment Bill)
टीएमसी खासदार कल्याण बॅनर्जी म्हणाले की, बैठकीत अघोषित आणीबाणी सुरू असल्यासारखे वातावरण आहे. अध्यक्ष बैठकीत कोणाचेही ऐकून घेत नाहीत. आम्हाला सांगण्यात आले होते की, २४ आणि २५ जानेवारी रोजी बैठक होईल. आता, आजच्या बैठकीसाठी, अजेंडा कलमानुसार चर्चेतून बदलण्यात आला आहे.