Rahul Gandhi on Bihar Elections
नवी दिल्ली: बिहारमध्ये यंदा मतदान केवळ सरकार बदलण्यासाठी नव्हे, तर बिहारला वाचवण्यासाठी करायचे आहे, असे म्हणत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी बिहार सरकारवर टीका केली. ऐन निवडणुकीच्या पूर्वी बिहारमधील कायदा व सुव्यवस्थेवरून राहुल गांधींनी बिहार राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. बिहार भारतातील गुन्हेगारी जगताची राजधानी आहे. प्रत्येक गल्लीत भीती आणि घरात अस्वस्थता आहे, अशी टीका राहुल गांधींनी सोशल मीडियाद्वारे केली.
बिहारमधील विविध ठिकाणी झालेल्या हत्यां सदर्भातील बातमीचा संदर्भ देत राहुल गांधी म्हणाले की, बिहारमधील गुंडाराज बेरोजगार युवकांना गुन्हेगार बनवत आहे. मुख्यमंत्री आपली खुर्ची वाचवत आहेत, तर भाजपचे मंत्री कमिशन कमवत आहेत, असेही ते म्हणाले.
दरम्यान, गेले काही दिवस राहुल गांधी सातत्याने बिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहार दौऱ्यात वेगवेगळ्या भागांना भेटी देऊन स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणे आणि त्या माध्यमातून निवडणुकीची तयारी करणे, असा उपक्रम राहुल गांधींच्या वतीने सुरू आहे. या दरम्यान राहुल गांधींनी सरकारला वेळोवेळी चांगलेच धारेवर धरले. बिहारमधील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राहुल गांधींनी सरकारवर कडाडून टीका केली.