नवी दिल्ली : सकाळ झाल्यावर डोळ्यांच्या कोपऱ्यात हलकासा कचरा (मळ किंवा चिकट पदार्थ) दिसणे ही एक सामान्य बाब आहे. या माध्यमातून डोळे स्वतःची स्वच्छता नैसर्गिकरीत्या करत असतात; पण काही लोक तक्रार करतात की, त्यांच्या डोळ्यांतून सारखा पिवळा किंवा पांढरा, चिकट स्राव बाहेर पडत असतो.
यासंदर्भात अमेरिकन डॉक्टर एरिक बर्ग स्पष्ट करतात की, डोळ्यांत सतत चिकट पदार्थ जमा होण्याचे एक मुख्य कारण व्हिटॅमिन ‘ए’ची कमतरता असू शकते. जेव्हा शरीरात व्हिटॅमिन ‘ए’ कमी होते, तेव्हा डोळे कोरडे पडू लागतात. कोरडेपणा वाढू नये म्हणून डोळे स्वतःच्या संरक्षणासाठी जाड म्यूकस तयार करतात. हाच म्यूकस रात्रभर जमा होऊन चिकट पदार्थाचे रूप घेतो. यामुळे डोळ्यांत खाज सुटणे किंवा गंभीर परिस्थितीत अंधुक दिसणे अशा समस्या वाढू शकतात. ज्या लोकांना आयर्नची कमतरता आहे, पित्ताशयाचे किंवा यकृताचे विकार आहेत, तसेच अपचन अशा समस्यांनी त्रस्त आहेत, त्यांच्यात व्हिटॅमिन ‘ए’ची कमतरता अधिक दिसून येते. व्हिटॅमिन ‘ए’ यकृतामध्ये साठवले जाते.
याव्यतिरिक्त, जे लोक अल्कोहोलचे (मद्य) जास्त सेवन करतात त्यांनाही डोळ्यांचा त्रास होऊ शकतो. अंड्याचा पिवळा भाग, दूध आणि तूप, गाजर, रताळे हे सर्व पदार्थ व्हिटॅमिन ‘ए’चे उत्तम स्रोत आहेत. याचबरोबर डोळ्यांच्या समस्यांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार घेणे आवश्क आहे.