राष्ट्रीय

Voter ID Cancellation : सावधान! 'मतदार ओळखपत्र रद्द होणार..'; व्हायरल मेसेजवर विश्वास ठेवू नका, निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा

निवडणूक आयोगाच्या नावाने बनावट मेसेज व्हायरल; वैयक्तिक माहिती शेअर न करण्याचे 'सीईओ महाराष्ट्र'चे आदेश

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : सोशल मीडियाच्या युगात माहिती जितक्या वेगाने पसरते, तितक्याच वेगाने अफवा आणि फेक मेसेजही नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी व्हायरल होत असतात. सध्या असाच एक प्रकार समोर आला आहे. यात भारत निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या नावाने WhatsApp वर एक बनावट संदेश आणि मोबाईल क्रमांक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या मेसेजद्वारे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असून, मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्यांच्या ChiefElectoralOffice या अधिकृत 'X' हँडलवरून महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

काय आहे तो बनावट संदेश आणि दावा?

सध्या व्हॉट्सॲपवर फिरणाऱ्या या बनावट मेसेजमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, ‘विशेष सखोल पुनरीक्षण २०२६ (SIR-2026) दरम्यान मतदारांच्या कागदपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर विसंगती किंवा त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे संदेशात दिलेल्या विशिष्ट मोबाईल क्रमांकावर मतदारांनी त्वरित संपर्क साधावा. जर दिलेल्या वेळेत संपर्क केला नाही, तर मतदाराचे मतदार ओळखपत्र (Voter ID) मतदार यादीतून हटवले किंवा रद्द केले जाईल.’ या मेसेजसोबत निवडणूक आयोगाचा लोगो आणि काही मोबाईल क्रमांक देखील जोडण्यात आले आहेत, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना तो अधिकृत संदेश असल्यासारखा वाटू शकतो.

तथ्य पडताळणी : निवडणूक आयोगाचा खुलासा

मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्याकडून या व्हायरल मेसेजची गंभीर दखल घेण्यात आली आहे. त्याची सत्यता तपासल्यानंतर हा संपूर्ण प्रकार एक फसवणूक असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या माहितीनुसार, ‘व्हायरल मेसेजमधील दावा पूर्णपणे खोटा आहे. भारत निवडणूक आयोग किंवा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांनी असा कोणताही मेसेज किंवा व्हॉट्सॲप क्रमांक जारी केलेला नाही,’ असे स्पष्ट केले आहे. तसेच, ‘निवडणूक आयोग (ECI) किंवा मुख्य निवडणूक अधिकारी (CEO) कोणत्याही मतदाराला वैयक्तिक रित्या व्हॉट्सॲपवर अशा प्रकारच्या नोटीस अथवा धमक्यावजा संदेश पाठवून कागदपत्रांची मागणी करत नाहीत,’ असाही खुलासा केला आहे.

‘व्हायरल होत असलेल्या या संदेशाची भाषा, त्याचे स्वरूप आणि त्यामध्ये करण्यात आलेला अधिकाऱ्यांचा उल्लेख हा निवडणूक आयोगाच्या अधिकृत आणि शासकीय पद्धतीशी अजिबात सुसंगत नाही. त्यामुळे हा संदेश सायबर गुन्हेगारांचे कृत्य असण्याची दाट शक्यता आहे,’ अशी सतर्कता व्यक्त करण्यात आली आहे.

मतदारांनी काय करावे?

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मतदारांना सतर्क राहण्याचे आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला बळी न पडण्याचे आवाहन केले आहे.

निवडणूक आयोगाने म्हटलंय की, अशा कोणत्याही बनावट आणि संशयास्पद संदेशांवर नागरिकांनी अजिबात विश्वास ठेवू नये. मेसेजमध्ये दिलेल्या अनोळखी किंवा संशयास्पद मोबाईल क्रमांकांवर संपर्क साधण्याची चूक करू नका. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, अशा कोणत्याही कॉल किंवा मेसेजवर स्वतःची वैयक्तिक माहिती, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा इतर महत्त्वाची कागदपत्रे शेअर करू नका, कारण यामुळे आर्थिक फसवणूक किंवा डेटा चोरी होऊ शकते.’

मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आवाहन

हा मेसेज पूर्णपणे खोटा असल्यामुळे नागरिकांनी तो इतर ग्रुप्सवर फॉरवर्ड करणे टाळावे, जेणेकरून अफवा पसरणार नाहीत. मतदार यादी, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) किंवा इतर कोणत्याही निवडणूक विषयक अधिकृत कामासाठी नागरिकांनी केवळ भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या अधिकृत वेबसाईट्सना भेट द्यावी. तसेच त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरील माहितीवरच विश्वास ठेवावा. याशिवाय, आपल्या भागातील अधिकृत बीएलओ (BLO - Booth Level Officer) यांच्याकडून प्रत्यक्ष मिळणाऱ्या माहितीचीच खात्री करून घ्यावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT