Viral Video JCB fall
शिमला : हिमाचल प्रदेशची राजधानी शिमल्यामध्ये रस्त्यावरील दरड हटवत असलेली एक जेसीबी मशीन डोंगरावरून घसरून तब्बल ३०० मीटर खोल दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या अपघातात जेसीबी चालकाचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामध्ये मशीन डोंगराच्या कड्या-कपारींना धडकत खेळण्यातील जेसीबीसारखा खाली कोसळताना दिसत आहे.
मुसळधार पावसामुळे कुमारसेन येथील शनांदमध्ये राष्ट्रीय महामार्ग-५ दरड कोसळ्यामुळे बंद झाला होता. यामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जेसीबी मशीनने दगड, माती काढले जात होते. त्याचवेळी अचानक एक मोठा दगड खाली आला, ज्यामुळे मशीनचे नियंत्रण सुटले आणि चालकासह खोल दरीत कोसळले. या अपघातात जेसीबी चालक दिनेश कुमार यांना अपघातग्रस्त मशीनमधून बाहेर काढून कुमारसेन येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. दिनेश हे मंडी जिल्ह्यातील रहिवासी होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, तो पाहणाऱ्यांच्या अंगावर काटा आणत आहे.
हिमाचल प्रदेशात मुसळधार मान्सून पावसामुळे हाहाकार माजला असतानाच ही दुर्दैवी घटना घडली आहे. राज्याच्या अनेक भागांतून भूस्खलन, आकस्मिक पूर आणि रस्ते खचल्याच्या घटना समोर येत आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माहितीनुसार, यावर्षी मान्सून काळात ढगफुटी, आकस्मिक पूर, भूस्खलन आणि वीज कोसळण्याच्या घटनांमध्ये आतापर्यंत १०१ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर, रस्ते अपघातांमुळे ७८ जणांना आपला जीव गमवावा लागला असून, यापैकी अनेक अपघात खराब हवामान आणि असुरक्षित परिस्थितीमुळे झाले होते.
हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे ४०० हून अधिक रस्ते बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला आहे आणि सुमारे २०० पाणीपुरवठा योजना विस्कळीत झाल्या आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लाहौल आणि स्पितीमधील राष्ट्रीय महामार्ग-५०५ भूस्खलनामुळे बंद आहे. अनेक भागांमध्ये घरे कोसळली असून पूल वाहून गेले आहेत.