हावडा : हावड्यात एका मतदान केंद्राबाहेर गोंधळ घालून मतदान प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार्‍या एकाला पोलिसांनी उचलून नेले.  (एएनआय व्हिडीओ ग्रॅब फोटो)
राष्ट्रीय

West Bengal election violence | प. बंगालमध्ये हिंसाचार, एकाचा मृत्यू

मतदानाच्या दुसर्‍या टप्प्यात भाजप-तृणमूल समर्थक भिडले

पुढारी वृत्तसेवा

कोलकात्ता; वृत्तसंस्था : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या दुसर्‍या टप्प्यातील मतदानादरम्यान बुधवारी अनेक विधानसभा मतदारसंघांत हिंसाचार आणि मारहाणीच्या घटना घडल्या. विशेषतः, भाजप आणि तृणमूल काँग्रेस (टीएमसी) समर्थकांत अनेक ठिकाणी राडा झाला. बूथवर हल्ले करण्यात आले. भाजप उमेदवाराच्या कारवर दगडफेक करण्यात आली. उदय नारायणपूर येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कारावाईत एका वृद्धाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.

बिजपूरमध्ये टीएमसी नगरसेवक आणि अपक्ष उमेदवारात हाणामारी झाली. भाजपच्या एका पोलिंग एजंटवर हल्ला करण्यात आला. त्याच्या डोक्याला सहा टाके पडल्याचे सांगण्यात आले. मतदानादरम्यान टीएमसी कार्यकर्त्यांनी रॉड आणि बंदुकांनी हल्ला केल्याचा आरोप छपरा मतदारसंघातील हतरा पंचायतीतील भाजपचे पोलिंग एजंट मुशर्रफ मीर यांनी केला. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असून, डोक्याला सहा टाके पडल्याचे त्यांनी सांगितले.

बिजपूरमध्ये कांचरापाडा नगरपालिकेचे टीएमसी नगरसेवक कल्याण कर यांचा भाजप आणि अपक्ष उमेदवाराशी वाद झाला. त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. पोलिसांनी मध्यस्थी करत त्यांना हटवले. दक्षिण 24 परगणा जिल्ह्यातील बसंती येथील बूथ क्रमांक 76 वर भाजप उमेदवार विकास सरदार यांच्या कारवर हल्ला करण्यात आला. टीएमसीच्या गुंडांनी हा हल्ला केल्याचा आरोप सरदार यांनी केला.

टीएमसी-डाव्या कार्यकर्त्यांत संघर्ष

हुगळी जिल्ह्यातील खानकुल येथील राजहाटी-1 पंचायतीच्या बूथ क्रमांक 147 वर बनावट पोलिंग एजंट नियुक्त केल्याच्या आरोपावरून टीएमसी आणि इंडियन सेक्युलर फ्रंट समर्थकांमध्ये जोरदार हाणामारी झाली. पानीहाटीमध्ये भाजप उमेदवार रत्ना देबनाथ यांनी, एका वृद्धेला त्रास होत असल्याचे दिसताच एका व्यक्तीला मदत करण्यास सांगितले. त्यावेळी टीएमसीच्या गुंडांनी माझ्यावर हल्ला केल्याचा आरोप देबनाथ यांनी केला.

ईव्हीएममध्ये बटणावर टेप; भाजपचा आरोप

डायमंड हार्बरमधील फालता येथे ईव्हीएममधील भाजपचे बटण टेप लावून ब्लॉक करण्यात आल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्यावर, यात सत्यता असेल तर तिथे पुन्हा मतदान घेतले जाईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

नादिया जिल्ह्यातील शांतिपूर विधानसभा मतदारसंघातील वॉर्ड क्रमांक 16 च्या स्टीमर घाट भागात भाजपच्या निवडणूक केंद्रावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे.

सुवेंदू अधिकारी यांना टीएमसी कार्यकर्त्यांनी घेरले

भवानीपूर येथील मतदान केंद्राला भेट देण्यासाठी पोहोचलेले सुवेंदू अधिकारी यांना टीएमसी समर्थकांनी घेरून त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. ‘सीआरपीएफ’ आणि पोलिसांनी कोलकाता येथील त्या बूथवर लाठीमार करून गर्दी पांगवली. दरम्यान, टीएमसी समर्थकांनी ठिकठिकाणी दहशत माजवल्याचा आरोप करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT