नवी दिल्ली : कर्नल राय, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी सकाळी पत्रकार परिषदेत लष्कराची भूमिका स्पष्ट केली. pudhari photo
राष्ट्रीय

भारत कोणत्याही थराला जाण्यास तयार

परराष्ट्र सचिवांनी ठणकावले; शांततेसह द़ृढतेचे धोरण मात्र अबाधित

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आम्ही नेहमीच शांततेच्या बाजूने आहोत; परंतु आमच्या सार्वभौमत्वाशी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही. पाकिस्तानच्या बेजबाबदार कारवायांना आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने पुढाकार घ्यावा; मात्र पाकची आगळीक सुरूच राहिल्यास भारत कोणत्याही थराला जाण्यास तयार आहे, अशा स्पष्ट शब्दांत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी पाकला इशारा दिला आहे.

परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी, कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी शनिवारी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या कारवाया उघड केल्या आणि भारतीय सशस्त्र दलांच्या तयारी आणि प्रत्युत्तराबद्दल सविस्तर माहिती दिली. परराष्ट्र सचिव मिसरी म्हणाले, मी यापूर्वीही अनेकदा सांगितले आहे की, पाकिस्तानच्या कारवायांमुळे वारंवार तणाव वाढला आहे. असे असूनही भारताने नेहमीच संयम आणि जबाबदारीने प्रतिसाद दिला आहे. पण पाकिस्तानी सैन्य आता पुढच्या भागात सैन्य पाठवून परिस्थिती आणखी बिघडवण्याचा प्रयत्न करत आहे.

परराष्ट्र सचिवांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तानच्या या कारवायांची दखल घेण्याचे आणि प्रादेशिक शांततेसाठी ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले. भारताला शांतता हवी आहे; परंतु तो आपल्या सार्वभौमत्वाशी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणार नाही, याचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

कर्नल सोफिया कुरेशी यांचे जोरदार प्रत्युत्तर

पाकिस्तानने पश्चिम आघाडीवर अनेक चिथावणीखोर कारवाया केल्या आहेत. पाकिस्तानने पंजाबमधील एका एअरबेसला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्याने लांब पल्ल्याची शस्त्रे, फिरता दारूगोळा आणि लढाऊ विमाने वापरली; पण भारतीय सशस्त्र दलांनी हे सर्व हल्ले हाणून पाडले, अशा शब्दांत कर्नल सोफिया कुरेशी यांनी पाकिस्तानच्या लष्करी कारवायांबद्दल माहिती दिली.

पाकिस्तानने लाहोरहून उड्डाण करणार्‍या नागरी विमानांचा लष्करी कारणांसाठी गैरवापर केला. हे आंतरराष्ट्रीय नियमांचे आणि मानवी मूल्यांचे घोर उल्लंघन आहे. अशा कृतींमुळे केवळ प्रादेशिक स्थिरता धोक्यात येत नाही, तर जागतिक नागरी विमान वाहतूक सुरक्षेलाही धोका निर्माण होतो, असेही त्या म्हणाल्या.

पाकिस्तानी सैन्याने उधमपूरमध्ये भारताची एस-400 हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केल्याचा खोटा दावा केला आहे. कुरेशी यांनी हे दावे फेटाळून लावले. आमची हवाई संरक्षण प्रणाली पूर्णपणे सुरक्षित आणि सक्रिय आहे. आम्ही पाकिस्तानी सैन्याचे मोठे नुकसान केले आहे; परंतु आम्ही तणाव वाढवण्याच्या बाजूने नाही, असे कुरेशी म्हणाल्या.

आंतरराष्ट्रीय समुदायाची भूमिका

पाकिस्तानच्या या कारवायांमुळे आंतरराष्ट्रीय समुदायालाही चिंता वाटू लागली आहे. नागरी विमानांचा लष्करी गैरवापर करण्यासारख्या कृती केवळ भारत-पाकिस्तान संबंधांवर परिणाम करत नाही, तर जागतिक सुरक्षेलाही धोका निर्माण करतात. भारत हा मुद्दा संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उपस्थित करण्याची योजना आखत आहे.

पाकने निवासी भागांवर हल्ला केला

भारतीय हवाई दलाच्या विंग कमांडर व्योमिका सिंह म्हणाल्या, पाकिस्तानने एकूण 26 ठिकाणी हल्ला केला, ज्यामध्ये लष्करी तळ तसेच निवासी भागांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय सशस्त्र दलांच्या सज्जतेमुळे बहुतेक हल्ले उधळून लावण्यात आले आणि अत्यल्प नुुकसान झाले. आमचे हवाई तळ पूर्णपणे सुरक्षित आणि कोणत्याही प्रसंगासाठी सज्ज आहेत. यावेळी व्योमिका सिंह यांनी भारतीय हवाई तळाची ताजी छायाचित्रे पत्रकार परिषदेत सादर करत पाकचा खोटारडेपणा उघड केला. त्या म्हणाल्या, पाकिस्तानच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून भारतीय हवाई दलाने अचूक हल्ल्यांद्वारे पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT