भारताचे पहिले खासगीरीत्या विकसित केलेले ऑर्बिटल-क्लास रॉकेट ‘विक्रम-१’ने शनिवारी येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी उड्डाण केले.  
राष्ट्रीय

Vikram-1 Launch | पहिल्या खासगी रॉकेटचाही ‘विक्रम’!

यशस्वी उड्डाण : रचला नवा इतिहास; खासगी अंतराळ प्रक्षेपणात भारत ठरला तिसरा देश

पुढारी वृत्तसेवा

श्रीहरिकोटा; वृत्तसंस्था : भारताचे पहिले खासगीरीत्या विकसित केलेले ऑर्बिटल क्लास (कक्षीय श्रेणीचे) रॉकेट 'विक्रम-१' ने शनिवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून यशस्वी उड्डाण केले. देशातील खासगी अंतराळ क्षेत्र आणि व्यावसायिक प्रक्षेपण मोहिमांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. विक्रम-१च्या निमित्ताने भारताच्या अंतराळ क्षेत्रात नवा इतिहास रचला गेला आहे. दुपारी १२.०५ वाजता हे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले.

या ऑर्बिटल रॉकेटने आपला अंतिम टप्पा पूर्ण केला असून पेलोडस्‌ (उपग्रह) साधारण ४५० किमीच्या कक्षेत यशस्वीपणे स्थापित केले आहेत, असे हे रॉकेट विकसीत करणाऱ्या हैदराबादस्थित ‘स्कायरूट एरोस्पेस’ या कंपनीने म्हटले आहे. खासगी अंतराळ प्रक्षेपण क्षमता असणारा भारत हा जगातील अमेरिका, चीननंतर तिसरा देश ठरला आहे. या मोहिमेला ‘मिशन आगमन’ असे नाव देण्यात आले आहे. उपग्रह पृथ्वीच्या पृष्ठभागापासून कमी उंचीच्या कक्षेत (लो अर्थ ऑर्बिट) स्थापित करण्याचा तोही भारतातील एखाद्या खासगी कंपनीचा हा पहिलाच प्रयत्न आहे. ‘स्कायरूट एरोस्पेस’चे संस्थापक पवन कुमार चंदना आणि नागा भारत डाका यांनी इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांच्यासोबत मिशन कंट्रोल सेंटरमधून या प्रक्षेपणाचा थरार अनुभवला. हे दोघेही इस्रोचे माजी शास्त्रज्ञ आहेत. या ऐतिहासिक क्षणी इस्रोचे माजी प्रमुख, अंतराळवीर शुभांशू शुक्ला उपस्थित होते. सकाळी ११.३० च्या नियोजित वेळेच्या काही मिनिटे आधी मिशन कंट्रोल टीमने काऊंटडाऊन (उलट गणना) काही काळासाठी थांबवल्यामुळे प्रक्षेपणाला थोडा विलंब झाला.

हॅलो स्पेस, आम्ही आलो..!

यशस्वी प्रक्षेपणानंतर स्कायरूट

एरोस्पेसने एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले

आहे की, हॅलो स्पेस, आम्ही आलो

आहोत! विक्रम-१ च्या पहिल्या चाचणी उड्डाणाने आपली मोहीम फत्ते केली आहे. भारतीय खासगी क्षेत्रातील पहिलेवहिले प्रक्षेपण यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहे.

अंतराळातही ‘वंदे मातरम्‌’

या रॉकेटमधून ४५० किलोमीटरच्या कक्षेत पंतप्रधान मोदींचे एक पोस्टकार्डही पाठवण्यात आले होते. त्यावर ‘वंदे मातरम्‌’ हा नारा लिहिलेला होता. याचा संदर्भ देत पवन कुमार चंदना पंतप्रधानांना म्हणाले, तुमचे कार्ड यशस्वीपणे अंतराळ कक्षेत पोहोचले आहे. आता अंतराळातही ‘वंदे मातरम्‌’ घुमत आहे.

भारताच्या आत्मनिर्भरतेची प्रचिती : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विक्रम-१’च्या यशस्वी प्रक्षेपणाचे भरभरून कौतुक केले. यामुळे देशाच्या आत्मनिर्भरतेच्या मोहिमेला बळ मिळाल्याचे त्यांनी म्हटले आहे. शनिवारी मिळालेल्या या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधानांनी ‘स्कायरूट एरोस्पेस’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पवन कुमार चंदना आणि सहसंस्थापक नागा भारत डाका यांच्याशी फोनवरून संवाद साधत, त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण कंपनीचे विशेष अभिनंदन केले. चंदना यांनी जेव्हा हे रॉकेट पूर्णपणे भारतातच डिझाईन आणि तयार केले गेल्याची माहिती दिली, तेव्हा पंतप्रधान म्हणाले की, ही मोहीम आपण आत्मनिर्भर होऊ शकतो, हे सिद्ध करते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT