नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : देशात आर्थिक गुन्हे करून विदेशात पळ काढलेल्या विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांच्या जप्त संपत्तीचा मोठा भाग सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना देण्यात आला असल्याची माहिती सक्तवसुली संचलनालयाकडून बुधवारी देण्यात आली. वरील तिन्ही गुन्हेगारांची सुमारे १८ हजार १७० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली असून त्यातील ९ हजार ३७१ कोटी संबंधित बँकांना देण्यात आले असल्याचे ईडीने सांगितले आहे.
अधिक वाचा : 'भाजपमध्ये गेलो आमची चूक झाली'
तत्कालीन लिकर किंग विजय मल्ल्या, हिरे व्यापारी मेहुल चोक्सी व पीएनबीची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या नीरव मोदी यांनी बँकांचे जे नुकसान केले होते, त्यापैकी ८० टक्के किंमतीची वरील तिघांची संपत्ती आतापर्यंत ईडीने जप्त केली आहे. ईडीने ६ हजार ६०० कोटी रुपयांचे शेअर्स स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकांच्या समुहाला हस्तांतरित केले आहेत.
अधिक वाचा : तिसऱ्या आघाडीसाठी तिसरी भेट?; प्रशांत किशोर- शरद पवार यांच्यात दिल्लीत खलबते सुरुच
मुंबईतील विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निर्देशानुसार ईडीने ही कृती केली आहे. दुसरीकडे स्टेट बँकेच्या नेतृत्वाखालील बँकिंग समुहातर्फे युनायटेड ब्रूवरीजच्या ५ हजार ८२४ कोटी रुपयांच्या समभागांची डीआरटी म्हणजे कर्ज वसुली प्राधिकरणाने विक्री केली आहे.
अधिक वाचा : कोरोनामुक्तीचा दर ९६.५६ टक्के, ५० हजारांहून अधिक नवे रुग्ण
ईडीने मंगळवारी ८ हजार ४४१ कोटी रुपयांची संपत्ती नुकसान झालेल्या बँकांना हस्तांतरित केली होती. वरील तिन्ही आर्थिक गुन्हेगारांनी बँकांचे २२ हजार ५८६ कोटी रुपयांचे नुकसान व फसवणूक केली होती. त्यापैकी ८०.४५ टक्के म्हणजे १८ हजार १७० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. बँकांच्या एकूण नुकसानीपैकी ४० टक्के रकमेची वसुली आतापर्यंत झाली आहे.