नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा-
परदेशात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 'विद्या लक्ष्मी योजने'चा लाभ घेता येत नाही, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी लोकसभेत दिली. ही योजना फक्त देशातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू आहे, असे ते म्हणाले.
परदेशात शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना ‘विद्या लक्ष्मी योजने’चा लाभ घेता येईल का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी विचारला. यावर उत्तर देताना शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, ही योजना फक्त भारतातील शैक्षणिक संस्थांमध्ये शिकणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांना लागू आहे. मग ती राज्य सरकारची शैक्षणिक संस्था असो किंवा केंद्र सरकारची. उच्च शिक्षण देणाऱ्या खाजगी संस्थांच्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळतो. पण यासाठी या सर्व संस्थांचे एनआयआरएफ रँकिंग चांगले असले पाहिजे.
केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी सांगितले की, उच्च शिक्षणासाठीच्या क्रेडिट हमी योजनेत, गेल्या ५ वर्षांत आतापर्यंत ११ लाख २६ हजार कोटी रुपयांच्या क्रेडिट हमी लाभार्थी आहेत. विद्या लक्ष्मी योजनेत कोणत्याही प्रकारच्या तारण हमीची आवश्यकता नाही. यामध्ये तारण आणि हमीमुक्त शैक्षणिक कर्ज मिळते. ज्यांचे कुटुंब उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येतो. पूर्वी ही मर्यादा ४ लाख रुपये होती. याशिवाय, या योजनेअंतर्गत १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर ३% व्याज अनुदानाची हमी देखील आहे.