Boom
पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियावर चीनच्या एका थीम पार्कमध्ये आयोजित हॅलोवीन पार्टीच्या दरम्यान, दोन मॅनिकनला (डमी) लाकडाला बांधून जाळले जात असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यूजर्स हा व्हिडिओ, बांगला देशातील हिंदूंवरील अत्याचाराचा असल्याचा दावा करत आहेत.
दरम्यान, फॅक्ट चेकर बूमने केलेल्या चौकशीत या व्हिडिओतील दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडिओ चीनच्या जुहाईमधील चिमलोंग ओशियन किंगडम थीम पार्कमध्ये आयोजित केलेल्या हॅलोवीन पार्टीत दोन मॅनिकनला भाजत असल्याचा आहे.
बांगला देशातील शेख हसीना यांचे सरकार उलथून टाकल्यानंतर बांगला देशात जातीय तणाव दिसून आला. २५ नोव्हेंबर २०२४ रोजी बांगला देशातील हिंदू समुदायाचा एक प्रमुख चेहरा आणि इस्कॉन मंदिराशी संबंधित असलेले चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेमुळे हा तणाव आणखी वाढला. बांगला देशातील हिंदूंवर अत्याचार होत असल्याचा आरोप भारतातील उजव्या विचारसरणीचे समुह करत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर व्हिडिओ शेअर करताना एका यूजरने म्हटले आहे की, 'सर्व हिंदूंनी आणि भारतातील सर्व केंद्र आणि राज्य सरकारांनी उघड्या डोळ्यांनी पाहावे. बांगला देशात हिंदू भावा-बहिणींवरील अत्याचार वाढत चाललाय. हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा; जेणेकरून शांतपणे झोपलेल्या, जाती-पातीत विभागलेल्या हिंदुंनी आणि निवडणुकांत अडकून पडलेल्या सरकारांची झोप उडेल.'
चीनमधील थीम पार्कचा व्हिडिओ
बूमने केलेल्या फॅक्ट चेकमध्ये आढळून आले की जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो चीनमधील एका थीम पार्कमधील आयोजित एका हॅलोवीन पार्टीचा आहे. ज्यात मॅनिकन जळताना दाखवले होते.
बूमला या दाव्यावर केलेल्या फॅक्ट चेकमध्ये असे आढळून आले की, हा व्हिडिओ X वर नोव्हेंबर २०२४ मध्येदेखील व्हायरल झाला होता. त्यावेळी तो हैतीमधील नरभक्षीच्या खोट्या दाव्यासह शेअर केला होता. एक्सवरील या पोस्टला दिलेल्या रिप्लायमध्ये, लोकांनी हा दावा खोटा असल्याचे म्हटले. यासोबत मलेशियातील चिनी भाषेतील Sin Chew Daily या न्यूज आउटलेटचा फॅक्ट चेक रिपोर्ट शेअर करण्यात आला.
जानेवारी २०२० च्या या लेखात असे नमूद केले होते की हा व्हायरल व्हिडिओ २०१८ मध्ये चीनमधील जुहाई येथील चिमलोंग ओशियन किंगडम थीम पार्कमध्ये आयोजित हॅलोविन पार्टीचा आहे. या लेखात व्हायरल व्हिडिओची एक मुख्य फ्रेमदेखील पाहिली जाऊ शकते. नायजेरियातील एका रेस्टॉरंटमध्ये नरभक्षण झाल्याच्या घटनेचा खोटा दावा करून हाच व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
चिमलोंग ओशियन किंगडम थीम पार्क हे चीनमधील जुहाई येथे आहे. याच लोकेशनवरुन संकेत घेऊन शोध घेतल्यावर ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी इन्स्टाग्रामवर शेअर केलेला असाच एक व्हिडिओ आढळून आला. यातदेखील व्हायरल व्हिडिओसारखा सेटअपही दिसून येतो. या व्हिडिओत एक व्यक्ती मॅनिकनला काठीने फिरवताना दिसत आहे.
@galaxychimelong या इन्स्टाग्राम हँडलवर थीम पार्कचे इतर व्हिडिओ आणि फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यात 'चिमलोंग ओशियन किंगडम' लोकेशनदेखील टॅग करण्यात आले आहे.
फेसबुक पेज Sillynanomagवर १७ ऑक्टोबर २०१८ रोजी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. यात पर्यटक मॅनिकनला काठीने फिरवताना दिसतात. यातून असे दिसून येते की हा थीम पार्कमधील हॅलोविन पार्टीसाठी तयार केलेला सेटअप आहे. व्हिडिओत ४२ सेकंदांच्या टाइमस्टॅम्पवरून हे पाहिले जाऊ शकते.
याशिवाय, ‘Halloween party at Chimelong Ocean Kingdom’ या कीवर्डसह सर्च केल्यावर आम्हाला YouTube वर ऑक्टोबर २०१८ चा एक व्लॉगदेखील सापडला. ज्यात या थीम पार्कची दृश्ये दिसतात, जी व्हायरल व्हिडिओशी जुळतात.
This story was originally published by BOOM {https://hindi.boomlive.in/fact-check/hindus-burnt-alive-bangladesh-false-claim-china-halloween-party-video-27237}, and republished by Pudhari as part of the Shakti Collective