पुढारी ऑनलाईन डेस्क : उपराष्ट्रपती जगदीप धनखड (Deputy President jagdeep Dhankar) यांना रविवारी (दि.9) सकाळी एम्स दिल्लीच्या हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे आणि त्यांना आता डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. उपराष्ट्रपतींना रात्री उशिरा अस्वस्थ वाटू लागले आणि छातीत दुखू लागले, त्यानंतर रविवारी सकाळी त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. अशा आशयाचे ट्वीट वृत्तसंस्था 'एएनआय'ने त्यांच्या सोशल मिडियावर केले आहे.
धनखड यांना पहाटे २ च्या सुमारास रुग्णालयात नेण्यात आले आणि सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. त्यांना क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. एम्सच्या कार्डिओलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली उपराष्ट्रपती धनखड यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांचे एक पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी एम्समध्ये जाऊन धनखड यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
जगदीप धनखड हे भारताच्या १४ व्या उपराष्ट्रपतीची जबाबदारी सांभाळत आहेत. याआधी ते पश्चिम बंगालचे राज्यपालही राहिले आहेत. जगदीप धनखड यांचा जन्म १८ मे १९५१ रोजी राजस्थानमध्ये झाला. धनखड यांनी १९८९ मध्ये त्यांचा राजकीय प्रवास सुरू केला. झुनझुनू लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९९० मध्ये त्यांनी संसदीय कामकाज राज्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारली. १९९३ मध्ये त्यांनी अजमेर जिल्ह्यातील किशनगढ मतदारसंघातून राजस्थान विधानसभा निवडणूक जिंकली. त्यानंतर ते पी.व्ही. नरसिंह यांच्या कार्यकाळात काँग्रेसमध्ये सामील झाले पण नंतर काँग्रेस सोडून भाजपमध्ये सामील झाले.