नवी दिल्ली: पुढारी वृत्तसेवा उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना हृदयरोगाशी संबंधित उपचारांनंतर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स), नवी दिल्ली येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे. एम्सने उपराष्ट्रपतींच्या डिस्चार्ज संबंधी जारी केलेल्या निवेदनात म्हटले की, वैद्यकीय पथकाने आवश्यक काळजी घेतल्यानंतर त्यांची प्रकृती समाधानकारक झाली. १२ मार्च रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. पुढील काही दिवस त्यांना पुरेशी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान, ९ मार्च रोजी पहाटे ‘एम्स’मधील हृदयविकार विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ह्रदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. राजीव नारंग यांच्या देखरेखीखाली क्रिटिकल केअर युनिट (सीसीयू) मध्ये त्यांना ठेवण्यात आले होते. डॉक्टरांचे पथक त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘एम्स’ला भेट देऊन उपराष्ट्रपती धनखड यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. तसेच केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी देखील रुग्णालयात जाऊन उपराष्ट्रपतींच्या तब्येतीची विचारपूस केली होती.