नवी दिल्ली : उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
राष्ट्रपती म्हणाल्या की, जगदीप धनकड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, मी त्यांना उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या हातून अनेक वर्षे देशसेवा घडो अशी प्रार्थना करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छा देताना म्हणाले की, एक आघाडीचे वकील म्हणून त्यांनी केलेल्या वर्षानुवर्षेच्या कामातून त्यांना आपल्या संविधानाचे प्रचंड ज्ञान लाभले आहे.
राज्यसभेची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांनी प्रशंसनीय प्रयत्न केले आहेत. समाजसेवेचीही त्यांना प्रचंड आवड आहे. त्यांना दीर्घ आणि निरोगी आयुष्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी, 'उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो आणि संसदीय लोकशाही टिकवून ठेवण्याची त्यांची वचनबद्धता अढळ राहो,' अशा शब्दात शुभेच्छा दिल्या.