नवी दिल्ली : देशाच्या उपराष्ट्रपतिपदासाठी आज (मंगळवारी) होणार्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. ‘एनडीए’ आणि ‘इंडिया’ आघाडी, दोन्ही आपापल्या खासदारांना एकजूट ठेवण्यासाठी आणि संभाव्य ‘क्रॉस व्होटिंग’ (पक्षादेशाविरोधात मतदान) टाळण्यासाठी रणनीतिक बैठकांमध्ये व्यस्त आहेत. एकीकडे ‘एनडीए’ने आपल्या खासदारांसाठी कार्यशाळा आयोजित करून मतदान प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली, तर दुसरीकडे ‘इंडिया’ आघाडीने संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ‘मॉक पोल’ (मतदान सराव) घेऊन तयारीला अंतिम स्वरूप दिले.
या निवडणुकीत काही तटस्थ पक्षांनी मतदान प्रक्रियेपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला असला, तरी दोन्ही बाजूंना अंतर्गत नाराजी आणि ‘क्रॉस व्होटिंग’ची भीती सतावत असून, विरोधी गोटातून मते मिळवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न सुरू आहेत.
बिजू जनता दलाचे (बीजेडी) राज्यसभा खासदार सस्मित पात्रा यांनी सांगितले की, पक्षप्रमुख नवीन पटनायक यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे. बीजेडीचे 7 खासदार आहेत. दुसरीकडे, भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) कार्याध्यक्ष के. टी. रामाराव यांनी सांगितले की, त्यांचा पक्ष या निवडणुकीत तटस्थ राहील. बीआरएसचे 4 खासदार आहेत.
देशातील दुसर्या सर्वोच्च घटनात्मक पदासाठी मंगळवारी मतदान होत आहे. सत्ताधारी ‘एनडीए’चे उमेदवार आणि महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. सी. पी. राधाकृष्णन आणि विरोधी ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती (निवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांच्यात सरळ लढत होईल. उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदान होणार असून, सायंकाळी 6 वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे.
या निवडणुकीत काही पक्षांमधील अंतर्गत असंतोषामुळे ‘क्रॉस व्होटिंग’ची शक्यता वाढली आहे.
जेडीयू : पक्षाचे ज्येष्ठ नेते महेश्वर हजारी गट बदलू शकतात, अशी चर्चा आहे. ते आपल्या मुलाच्या विधानसभा तिकिटासाठी काँग्रेसच्या संपर्कात असल्याचे समजते.
भाजप : पक्षाचे ज्येष्ठ खासदार राजीव प्रताप रुडी यांची नाराजीही चर्चेत आहे. नुकत्याच झालेल्या कॉन्स्टिट्यूशन क्लबच्या निवडणुकीत पक्षाने त्यांना हरवण्यासाठी ताकद लावली होती, तरीही त्यांनी विजय मिळवला. या घटनेमुळे ते नाराज असून, त्याचा परिणाम मतदानावर दिसू शकतो.
‘आप’ : आम आदमी पक्षाला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. खासदार हरभजन सिंग परदेशात आहेत, तर अशोककुमार मित्तल आणि स्वाती मालीवाल यांनी आधीच पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे ‘आप’मध्ये किमान दोन ‘क्रॉस व्होटिंग’ निश्चित मानले जात आहे.