Jagdeep Dhankhar on India Foreign Policy
नवी दिल्ली : संकटकाळात भारताविरोधात उभे राहणाऱ्या देशांना आर्थिकदृष्टया सक्षम करणे आपल्याला परवडणार नाही. प्रत्येक भारतीयाने आर्थिक राष्ट्रवादाबद्दल खोलवर विचार करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी शनिवारी केले. पर्यटनासाठी जाऊन किंवा आयातीद्वारे ‘त्या’ देशांची अर्थव्यवस्था सुधारण्यास आपण मदत करु नये, असे ते म्हणाले.
पाकिस्तानला मदत केल्याबद्दल आपल्या देशामध्ये सध्या तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची मोहीम सुरु आहे. या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींचे हे विधान आले आहे. त्यांनी तुर्की किंवा कोणत्याही देशाचे नाव न घेता भारतीयांना आवाहन केले आहे. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जयपुरिया इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटच्या वार्षिक दीक्षांत समारंभाला त्यांनी संबोधित केले.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीला राष्ट्रीय सुरक्षेसाठी देशाला मदत करण्याचा अधिकार आहे. व्यापार, व्यवसाय, वाणिज्य आणि विशेषतः उद्योग सुरक्षेच्या मुद्द्यांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. म्हणून माझा ठाम विश्वास आहे की, आपण नेहमीच राष्ट्र प्रथम ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.
उपराष्ट्रपतींनी ऑपरेशन सिंदूरसाठी लष्कराचे कौतुक केले. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून संपूर्ण जगाला संदेश दिला होता. ते पोकळ शब्द नव्हते. भारत जे बोलतो ते वास्तविक असते, हे आता जगाला कळले आहे, असे ते म्हणाले. सीमापार दहशतवादावर भारताने प्रहार केल्याचे जगाने पाहिले आणि मान्य केले. आता कोणीही पुरावे मागत नाही, असे ते म्हणाले. तंत्रात आणि दहशतवादाविरुद्धच्या लढाईत, ऑपरेशन सिंदूरने एक नवीन मानक स्थापित केला आहे, असे ते म्हणाले.
उपराष्ट्रपती धनखड म्हणाले की, २ मे २०११ रोजी अमेरिकेने एका जागतिक दहशतवाद्याला संपवले. त्याने २००१ च्या सप्टेंबरमध्ये अमेरिकेत हल्ला घडवला होता. भारतानेही ऑपरेशन सिंदूरमध्ये अशीच कारवाई केली. दरम्यान, ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’वर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये दहशतवादी ओसामा बिन लादेनचा हात होता. त्याचा बदला म्हणून अमेरिकेने २०११ च्या मे महिन्यात विशेष ऑपरेशन राबवून त्याचा खात्मा केला.