नवी दिल्ली : दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या प्रकरणातील सर्व मजकूर सार्वजनिक करून देशाच्या सरन्यायाधीशांनी स्वातंत्र्यानंतर प्रथमच अभूतपूर्व पाऊल उचलले आहे, अशा शब्दांत राज्यसभेचे अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी सरन्यायाधीशांचे कौतुक केले. न्याय यंत्रणेच्या खात्यांतर्गत प्रतिसाद हा योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल होते, असेही त्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात त्यांनी राज्यसभेतील नेत्यांची लवकरच बैठक बोलावणार असल्याचे स्पष्ट केले.
धनकड यांनी सभागृह नेते जे. पी. नड्डा आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशी या मुद्द्यावर चर्चा केली. या संवेदनशील मुद्द्यावर उपयुक्त चर्चा केल्याबद्दल मी नड्डा आणि खर्गे यांचा आभारी आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच सरन्यायाधीशांनी पारदर्शक आणि जबाबदार पद्धतीने हाती असणारा सर्व तपशील जाहीर केला आहे, असे बैठकीनंतर बोलताना उपराष्ट्रपती म्हणाले.
सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचेही त्यांनी कौतुक केले. ते म्हणाले, जर अंतर्गत यंत्रणा तत्पर, पारदर्शक आणि सार्वजनिक विश्वासार्ह असेल, तरच न्याय आणि संसदीयसारख्या संस्था परिणामकारक काम करू शकतील, अशी पुस्ती त्यांनी जोडली. त्याचबरोबर समितीच्या निष्कर्षाची आपण वाट पाहिली पाहिजे, त्यातून आपल्या भविष्यातील विचारविनिमयतेसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल. सभागृहातील नेत्यांची बैठक घेऊन त्यात याची चर्चा करण्याच्या खर्गे यांच्या सूचनेचे स्वागत करत त्यासंदर्भात लवकरच बैठक बोलावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
न्या. वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात ‘घरवापसी’ करण्याची शिफारस सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने केली. त्यामुळे 25 मार्चपासून अलाहाबाद उच्च न्यायालय बार असोसिएशनने बेमुदत संप जाहीर केला असल्याची माहिती बारचे अध्यक्ष अनिल तिवारी यांनी दिली. न्या. वर्मा यांची देशभरात कोणत्याही उच्च न्यायालयात बदली करण्यास विरोध आहेच. पण, अलाहाबाद किंवा उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठातही बदलीस आम्ही कडाडून विरोध करू, असे तिवारी म्हणाले.
राज्यसभेच्या सभापतींनी यासंदर्भात आज सभागृहातील सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये न्यायाधीशांवरील आरोपांबाबत पुढील कार्यवाहीबाबत चर्चा करण्यात आली. सध्या सर्वोच्च न्यायालयाने अंतर्गत तपास सुरू केल्याचे मान्य करण्यात आले आहे. त्यामुळे तपास अहवाल आणि त्यावर कारवाई होण्याची प्रतीक्षा करावी, असे बैठकीत सांगण्यात आले.