Vasundhara Raje Jhalawar Congress BJP Pudhari
राष्ट्रीय

Vasundhara Raje: राजस्थानमध्ये मोठा राजकीय भूकंप! वसुंधरा राजेंच्या बालेकिल्ल्यात भाजपला मोठा धक्का; काँग्रेसचा दणदणीत विजय

Vasundhara Raje Jhalawar Congress BJP Rajasthan Local Body Election: राजस्थानच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालावाड जिल्ह्यात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे.

Rahul Shelke

Vasundhara Raje Jhalawar Congress BJP Rajasthan Local Body Election: राजस्थानमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालावाड जिल्ह्यात अनपेक्षित राजकीय चित्र पाहायला मिळाले. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांचा प्रभाव असलेल्या या भागात काँग्रेसने भाजपला मोठा धक्का देत अनेक नगरपालिका आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. विशेष म्हणजे, झालावाड नगर परिषदेत काँग्रेसने स्पष्ट बहुमत मिळवत भाजपची सत्ता उलथवून टाकली आहे.

राजस्थानमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी सुरू असताना भाजप आणि काँग्रेसमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळत आहे. मात्र, झालावाड जिल्ह्यातील निकालांनी भाजपसाठी चिंता वाढवली आहे. वसुंधरा राजे यांचा राजकीय बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झालावाडमध्ये काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे.

जिल्ह्यातील आठ स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी चार ठिकाणी काँग्रेसने बहुमत मिळवत सत्ता काबीज केली आहे. झालावाड नगर परिषदेसह भवानी मंडी, खानपूर आणि डग येथे काँग्रेसचा झेंडा फडकला आहे. दुसरीकडे भाजपला झालरापाटन, अकलेरा आणि मनोहरथाना या तीन ठिकाणी सत्ता मिळवता आली. पिडावा येथे मात्र कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने आम आदमी पार्टीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

झालावाड नगर परिषदेत भाजपचा गड काँग्रेसने केला भुईसपाट

झालावाड नगर परिषद निवडणुकीचा निकाल काँग्रेससाठी विशेष महत्त्वाचा ठरला आहे. एकूण ४५ वॉर्ड असलेल्या नगर परिषदेत काँग्रेसने तब्बल २९ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले. भाजपला १३ जागांवर समाधान मानावे लागले. आपच्या वाट्याला एक जागा आली, तर दोन जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले.

यापूर्वी झालावाड नगर परिषदेत भाजपची सत्ता होती. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून हा गड कायम राखण्याची अपेक्षा होती. मात्र, काँग्रेसने निकालाच्या माध्यमातून भाजपला मोठा राजकीय धक्का दिला आहे.

झालावाड-बारां लोकसभा मतदारसंघ हा दीर्घकाळ वसुंधरा राजे यांच्या राजकीय प्रभावाचे केंद्र मानला जातो. राजे यांच्यानंतर त्यांचे पुत्र दुष्यंत सिंह यांनीही या मतदारसंघाचे सलग पाच वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे झालावाड नगर परिषदेतील काँग्रेसचा विजय हा केवळ स्थानिक पातळीवरील निकाल न मानता भाजपच्या पारंपरिक बालेकिल्ल्याला बसलेला धक्का म्हणून पाहिला जात आहे.

झालरापाटनमध्ये भाजपची पकड कायम

झालावाड जिल्ह्यातील इतर निकालांमध्ये भाजपला काही ठिकाणी आपला प्रभाव कायम राखण्यात यश आले आहे. वसुंधरा राजे ज्या झालरापाटन विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात, त्या भागातील नगरपालिकेत भाजपने दमदार कामगिरी केली.

झालरापाटन नगरपालिकेच्या २५ जागांपैकी भाजपने २२ जागा जिंकल्या. काँग्रेसला ८ आणि आम आदमी पार्टीला ५ जागा मिळाल्या. त्यामुळे या भागात भाजपचा प्रभाव अद्याप मजबूत असल्याचे निकालातून दिसून येते.

अकलेरा नगरपालिकेतही भाजपने आघाडी घेत २५ जागा जिंकल्या, तर काँग्रेसला ८ आणि अपक्षांना २ जागा मिळाल्या. मनोहरथाना येथे भाजपने २० पैकी ११ जागा मिळवत सत्ता मिळवली. काँग्रेसला ६ तर अपक्ष उमेदवारांना ३ जागा मिळाल्या.

काँग्रेसने तीन पालिकांमध्येही मिळवला मोठा विजय

भवानी मंडी नगरपालिकेत काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत २६ जागा जिंकल्या. भाजपला १३ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

खानपूरमध्येही काँग्रेसने भाजपला मोठ्या फरकाने मागे टाकले. येथे काँग्रेसच्या खात्यात १८ जागा, तर भाजपला केवळ ७ जागा मिळाल्या.

डग नगरपालिकेतही काँग्रेसने आपले वर्चस्व प्रस्थापित केले. काँग्रेसने १४ जागा जिंकल्या, तर भाजपला अवघ्या ६ जागांवर समाधान मानावे लागले.

पिडाव्यात 'आप' ठरला किंगमेकर

पिडावा नगरपालिकेचा निकाल मात्र इतरांपेक्षा वेगळा ठरला आहे. येथे कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. काँग्रेसला ८, भाजपला ६, आम आदमी पार्टीला ५ तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला.

त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आम आदमी पार्टीची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. पाच जागा मिळवणारा आप पक्ष येथे किंगमेकरच्या भूमिकेत आला आहे.

झालावाडच्या निकालाने भाजपसमोर नवी आव्हाने

एकीकडे झालरापाटन, अकलेरा आणि मनोहरथाना येथे भाजपने आपला प्रभाव कायम ठेवला असला, तरी झालावाड नगर परिषदेसह तीन अन्य ठिकाणी काँग्रेसने मिळवलेले यश भाजपसाठी निश्चितच धक्कादायक मानले जात आहे. विशेषतः वसुंधरा राजे यांच्या प्रभावक्षेत्रात काँग्रेसने केलेली मुसंडी आगामी राजस्थानच्या राजकारणाच्या दृष्टीने चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालातून झालावाडमध्ये मतदारांचा कल काही प्रमाणात बदलत असल्याचे संकेत मिळाले असून, काँग्रेसने भाजपच्या पारंपरिक गडात जोरदार प्रवेश केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT