Vande Bharat Pudhari
राष्ट्रीय

Vande Bharat Brake Failure: ब्रेक निकामी असतानाही ४६३ किमी धावली वंदे भारत; लोको पायलटच्या इशाऱ्याकडे रेल्वे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष

सर्व डब्यांची ब्रेकिंग सिस्टीम बंद असल्याचे उघड; हटिया ते डीडीयूपर्यंत इंजिनच्या ब्रेकवर प्रवास, सखोल चौकशीचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

रांची: डब्यांची ब्रेकिंग प्रणाली निकामी असतानाही एक रिकामी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस तब्बल ४६३ किलोमीटरपर्यंत धावल्याची गंभीर घटना समोर आली आहे. लोको पायलटने वारंवार धोक्याचा इशारा देऊनही रेल्वे कर्मचाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. याप्रकरणी दक्षिण पूर्व रेल्वे विभागाने रांचीच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

झारखंडमधील हटिया येथून उत्तर प्रदेशातील झाशी येथे मालवाहू इंजिनच्या मदतीने वंदे भारतचा रिकामा रेक २४ ऑक्टोबर रोजी नेला जात होता. नियमानुसार, वंदे भारतच्या डब्यांची ब्रेकिंग सिस्टीम या इंजिनशी जोडणे आवश्यक होते.

मात्र, रेल्वे कर्मचाऱ्यांनी तांत्रिक जोडणी नीट न करताच गाडी सोडली. प्रवास सुरू होताच ‘ब्रेक पॉवर टेस्ट’दरम्यान ब्रेक अत्यंत कमकुवत असल्याचे लोको पायलटच्या लक्षात आले. त्याने रांची स्थानकावर याबाबत लेखी तक्रार दिली. तरीही गाडी पुढे रवाना करण्यात आली. मुरी स्थानकावरून गाडी चालवणाऱ्या दुसऱ्या लोको पायलटनेही हाच धोका निदर्शनास आणून दिला. पण प्रशासनाने त्याकडे साफ दुर्लक्ष केले.

डीडीयू स्थानकावर प्रकार उघडकीस

अखेर उत्तर प्रदेशातील चंदौली जिल्ह्यातील दीनदयाळ उपाध्याय स्थानकावर अधिकाऱ्यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली. तपासणीअंती असे आढळून आले की, वंदे भारतच्या सर्व डब्यांची ब्रेकिंग सिस्टीम बंद (आयसोलेटेड) होती. त्यामुळे संपूर्ण ४६३ कि.मी.चा प्रवास केवळ इंजिनच्या ब्रेकवर आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगवर झाला होता.

कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा भोवला

आसाममध्ये ११ नोव्हेंबर रोजी कोलकाता-सैरांग एक्स्प्रेसला झालेल्या अपघाताच्या काही दिवस आधीच ही घटना घडली होती. प्राथमिक चौकशीत देखभाल करणारे कर्मचारी, सेक्शन कंट्रोलर आणि गाडीवरील कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.

१) लोको पायलटने रांची आणि मुरी स्थानकावर लेखी तक्रार देऊनही रेल्वे कर्मचाऱ्यांचे दुर्लक्ष.

२) झारखंडमधील हटिया ते उत्तर प्रदेशातील डीडीयू स्थानकापर्यंत केवळ इंजिनच्या ब्रेकवर प्रवास.

३) सर्व डब्यांची ब्रेकिंग सिस्टीम ‘आयसोलेटेड’ (बंद) असल्याने मोठ्या अपघाताचा होता धोका.

४) दक्षिण पूर्व रेल्वे विभागाकडून गंभीर दखल; रांचीच्या डीआरएमना सखोल चौकशीचे आदेश.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT