नवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयी यांनी राष्ट्रपती व्हावे आणि लालकृष्ण अडवाणी यांनी पंतप्रधान व्हावे, असा एक विचारप्रवाह 2002 मध्ये भारतीय जनता पक्षात होता. मात्र वाजपेयी यांनी तो फेटाळून लावला. बहुमताच्या जोरावर राष्ट्रपती होण्याने चुकीचा पायंडा पडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले, असा दावा तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी यांचे माध्यम सल्लागार अशोक टंडन यांच्या ‘अटल संस्मरण’ या पुस्तकात करण्यात आला आहे.
अशोक टंडन यांच्या अटल संस्मरण या पुस्तकाचे प्रकाशन बुधवारी केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी गडकरी म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे लोकशाहीवादी विचार आजही राजकारणासाठी आदर्श आहेत. अटलजींनी राजकारणाकडे केवळ सत्तेचा खेळ म्हणून न पाहता राष्ट्र, समाज आणि लोकनीतीचे माध्यम म्हणून पाहिले. त्यांच्या वर्तणुकीतून आणि नेतृत्वातून त्यांनी हा संदेश दिला की, मतभेद असू शकतात. परंतु मनभेद नसावेत. त्यांचा आदर्श आजच्या राजकीय नेतृत्वासाठी आणि लोकशाहीच्या मर्यादांसाठी मार्गदर्शक आहे.
याच कार्यक्रमात पुस्तकाचे लेखक आणि माजी पंतप्रधानांचे माध्यम सल्लागार राहिलेले अशोक टंडन म्हणाले, भाजपमध्ये असा विचार प्रवाह होता की, अटलजींनी राष्ट्रपती भवनात जावे आणि पंतप्रधानपद लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे सोपवावे. मात्र, वाजपेयींनी हा प्रस्ताव फेटाळून लावला. बहुमताच्या जोरावर राष्ट्रपती होण्याचे हे पाऊल संसदीय लोकशाहीसाठी चुकीचा पायंडा पाडेल, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. टंडन यांनी आपल्या अटल संस्मरण पुस्तकात लिहिले आहे की, वाजपेयींनी या विषयावर पूर्ण स्पष्टता दाखवली आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून सहमतीने राष्ट्रपती पदाचा उमेदवार ठरवण्याची परंपरा कायम राखली.
भाजपमधील या विचारमंथन दरम्यान काही नेत्यांनी डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांना राष्ट्रपती करण्याचा प्रयत्न केला होता, जेणेकरून काँग्रेसची कोंडी होईल. परंतु अटलजींनी लोकशाहीच्या दृष्टिकोनातून हे अयोग्य मानले. अखेर रालोआने 11 व्या राष्ट्रपती पदासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना उमेदवारी दिली. त्यांना काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळाला. त्यांनी असेही सांगितले की, अटलजी आणि अडवाणी यांच्यातील संबंधांमध्ये कधीही सार्वजनिक कटुता आली नाही. अडवाणी त्यांना नेहमीच आपले नेते आणि प्रेरणास्थान मानत असत, तर अटलजी त्यांना अटल साथी म्हणायचे. या दोघांनी भाजप संघटना आणि सरकारला स्थिरता व नवी दिशा दिली. या पुस्तकात 13 डिसेंबर 2001 रोजी झालेल्या संसद हल्ल्याचाही उल्लेख आहे. तेव्हा सोनिया गांधींनी अटलजींना फोन करून त्यांच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यावर अटलजींनी तत्काळ उत्तर दिले होते की, ते सुरक्षित आहेत आणि त्यांचे लक्ष विरोधी नेत्यांच्या सुरक्षेकडे अधिक आहे.