नवी दिल्ली; वृत्तसंस्था : जम्मू-काश्मीरमध्ये खराब हवामानामुळे वैष्णोदेवी यात्रा पुन्हा स्थगित करण्यात आली आहे. 19 दिवसांच्या स्थगितीनंतर ही यात्रा रविवारपासून सुरू होणार होती; परंतु मुसळधार पावसामुळे पुढील आदेशापर्यंत ती स्थगित केली आहे.
यापूर्वी 26 ऑगस्ट रोजी मंदिराकडे जाणार्या मार्गावर झालेल्या भूस्खलनामुळे 34 भाविकांचा मृत्यू झाला होता. उत्तर प्रदेशात संततधार पावसामुळे गंगा, यमुना यांसह अनेक नद्यांची पाणी पातळी अजूनही वाढलेली आहे. बलिया जिल्ह्यातील चक्की नौरंगा गावात 5 घरे आणि 5 दुकाने नदीच्या प्रवाहात वाहून गेली. या मान्सून हंगामात राज्यात आतापर्यंत 654.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे, जी सरासरी 679.3 मिमी पावसाच्या तुलनेत 4 टक्के कमी आहे. राजस्थानच्या पश्चिम भागातून रविवारपासून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. मात्र, मध्य प्रदेशातून मान्सून परतण्यासाठी आणखी दोन आठवडे लागण्याची शक्यता आहे.
हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील धर्मपूरमधील सपडी रोह गावात शनिवारी भूस्खलन झाले. अनेक घरांमध्ये माती आणि दगडांचा ढिगारा शिरला असून, खबरदारी म्हणून 8 घरे रिकामी केली आहेत. राज्यात पाऊस आणि पुरामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 386 वर पोहोचला आहे. राज्यात 12 सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा 133 टक्के जास्त पावसाची नोंद झाली आहे. या काळात 64.6 मिमीच्या तुलनेत 150.4 मिमी पाऊस झाला आहे.