V2V technology
नवी दिल्ली : रस्ते अपघात कमी करण्यासाठी भारत सरकार एक मोठे पाऊल उचलणार आहे. २०२६ च्या अखेरीस सरकार देशभरात वाहन-टू-वाहन (V2V) दळणवळण प्रणाली लागू करणार आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे रस्त्यांवरील अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल.
या तंत्रज्ञानामुळे गाड्या कोणत्याही नेटवर्क किंवा इंटरनेटशिवाय एकमेकांशी संवाद साधू शकतील. या कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमुळे चालकाला इतर गाड्यांचा वेग, त्यांचे स्थान आणि अचानक समोर येणाऱ्या वाहनांची माहिती त्वरित मिळेल. विशेषत म्हणजे उभ्या असलेल्या गाड्यांना धडकणे आणि धुक्यामुळे होणारे अपघात रोखण्यास यामुळे मदत होईल.
काय आहे V2V तंत्रज्ञान?
देशात दरवर्षी लाखो रस्ते अपघात होतात. त्यापैकी बहुतेक भरधाव वेगामुळे आणि कमी दृश्यमानतेमुळे होतात. अशा परिस्थितीत V2V तंत्रज्ञानामुळे ही समस्या दूर होईल. समजा तुम्ही धुक्यात हायवेवर वेगाने गाडी चालवत आहात आणि पुढे रस्त्याच्या कडेला एक ट्रक उभा आहे. धुक्यामुळे तुम्हाला तो ट्रक दिसत नाहीये, अशा वेळी हे तंत्रज्ञान तुम्हाला अलर्ट पाठवेल की पुढे धोका आहे, ज्यामुळे तुम्ही अपघातापासून वाचू शकाल.
ही यंत्रणा कशी काम करणार?
या तंत्रज्ञानांतर्गत प्रत्येक गाडीमध्ये सिम कार्डसारखे एक छोटे उपकरण बसवले जाईल, जे रेडिओ सिग्नलद्वारे आजूबाजूच्या गाड्यांशी संवाद साधेल. हे ३६०-डिग्री कव्हरेज देईल, म्हणजेच गाडीच्या चारी बाजूंनी सिग्नल मिळतील. जर एखादे वाहन धोकादायक रितीने जवळ आले, मग ते मागून असो, समोरून असो किंवा बाजूने, तर लगेच अलर्ट मिळेल.
या सिस्टमचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यासाठी इंटरनेट किंवा नेटवर्कची गरज भासणार नाही. धुक्यासारख्या परिस्थितीत जिथे दृश्यमानता शून्य असते, तिथे हे तंत्रज्ञान 'लाईफ सेव्हर' ठरेल. याशिवाय, रस्त्यावर उभ्या असलेल्या स्थिर गाड्यांची माहिती आणि सुरक्षित अंतर राखण्याच्या सूचनाही हे तंत्रज्ञान देईल.
प्रकल्पाचा खर्च किती?
जगातील मोजक्याच देशांमध्ये सध्या हे तंत्रज्ञान वापरले जात असून तिथे त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळत आहेत. म्हणूनच आता हे तंत्रज्ञान भारतातही आणण्याची तयारी सुरू आहे. यामुळे ट्रॅफिक मॅनेजमेंट सुधारेल आणि अपघातांचे प्रमाण घटेल. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च ५,००० कोटी रुपये आहे.
कधी आणि कसे लागू होणार?
या तंत्रज्ञानासाठी संबंधित मंत्रालय २०२६ च्या अखेरीस अधिसूचना जारी करेल. पहिल्या टप्प्यात नवीन गाड्यांमध्ये हे डिव्हाइस इन-बिल्ट येईल. त्यानंतर हळूहळू जुन्या गाड्यांमध्येही ते बसवण्याची प्रक्रिया सुरू होईल. सध्या प्रीमियम एसयूव्ही गाड्यांमध्ये 'ADAS' सिस्टीम असते जी सेन्सरवर चालते; V2V तंत्रज्ञान त्याला अधिक सक्षम करेल.