डेहराडून : हवामान बदलाचा धोका हिमालयासाठीही वाढला असून उत्तराखंडच्या मध्य हिमालयातील हिमनद्या (ग्लेशियर्स) दरवर्षी सरासरी २३.२३ मीटर वेगाने आकुंचन पावत आहेत. वाढते तापमान, हिमनद्यांचे विशिष्ट गुणधर्म आणि वाढता कचरा ही कारणे येथील बर्फ वितळण्यामागे महत्त्वाची ठरत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. या अभ्यासानुसार काही हिमनद्या तर दरवर्षी ८८ मीटरपर्यंत आकुंचन पावल्याचे स्पष्ट झाले आहे.
‘टाईम डिपेंडंट असेसमेंट ऑफ ग्लेशियर रिसेशन इन द इंडियन सेंट्रल हिमालय’ असे या अभ्यासाचे नाव आहे. ‘डिस्कव्हर जिओसायन्स’ या वैज्ञानिक नियतकालिकामध्ये तो प्रसिद्ध झाला आहे. १९९० ते २०२४ या काळातील उपग्रहाद्वारे मिळालेली छायाचित्रे आणि प्रत्यक्ष निरीक्षणांच्या आधारे हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. डेहराडून येथील ‘वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिओलॉजी’चे मनीष मेहता तसेच डेहराडूनच्या ‘युनिव्हर्सिटी ऑफ पेट्रोलियम अँड एनर्जी स्टडीज’मधील ज्योती कुमारी, गिरीश सी. कोठियारी आणि अतुल कुमार पाटीदार यांनी संयुक्तपणे केला आहे.
मेहता यांनी सांगितल्यानुसार, मध्य हिमालयातील हिमनद्या दरवर्षी २३.२३ मीटर वेगाने आकुंचन पावत आहेत. कमी वेगाने आकुंचन पावणाऱ्या हिमनद्यांमध्ये भागीरथी (उत्तरकाशी जिल्हा) आणि सतोपंथ (चमोली जिल्हा) या नद्यांचा समावेश आहे. त्यांच्या पृष्ठभागावर माती-कचऱ्याचे जाड आच्छादन असल्यामुळे किंवा त्या तुलनेने स्थिर असल्यामुळे त्यांचा आकुंचनाचा वेग खूप कमी म्हणजेच दरवर्षी सुमारे ३.७ मीटर इतका आहे.
याच्या उलट, सर्वांत वेगाने मागे हटणाऱ्या हिमनद्यांमध्ये टिहरी गढवालच्या भागीरथी खोऱ्यातील खतलिंगचा समावेश आहे. येथील बर्फ स्वच्छ आहे. त्यामुळे त्या संवेदनशील असतात. त्यांची जलद औष्णिक झीज होते. खतलिंगचे आकुंचन पावण्याचे प्रमाण दरवर्षी तब्बल ८८ मीटर आहे. या संशोधनावरून स्पष्ट होते की, हिमनद्यांवर असलेले माती-कचऱ्याचे आच्छादन आणि बर्फाचे स्वरूप यावरून तेथील बर्फ वितळण्याचा वेग कमी-जास्त असतो.