आमदार हरीश धामी 
राष्ट्रीय

Uttarakhand Politics | स्टेजवरुनच माईक फेकून मारला, खूर्ची घेऊन ऑपरेटरच्या अंगावर : उत्तरखंडमध्ये आमदाराचा व्यासपीठावरील थयथयाट पहा!

आमदार हरीश धामी यांचा हायव्होल्टेज ड्रामा, मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनाही आव्हान, भर सभेत अर्वाच्य भाषेचा वापर

Namdev Gharal

Congress MLA Haris Singh Dhami lost his temper व्यासपीठावरूनच माईक फेकून देणे, धावत खाली उतरून साउंड इंजिनिअर्सच्या दिशेने खुर्ची भिरकावणे आणि एका व्यक्तीची कॉलर पकडून कानशिलात लगावण्याचा प्रयत्न करणे, हा सर्व प्रकार उत्तराखंडमधील पिथौरागढ येथे घडला आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासमोरच व्यासपीठावरून बोलण्याची संधी न मिळाल्याने काँग्रेस आमदार हरीश धामी यांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी हा गोंधळ घातला.

उत्तराखंडच्या पिथौरागढ जिल्ह्यातील प्रसिद्ध जौलजीबी मेळ्याच्या व्यासपीठावर हा प्रकार घडला. दरम्यान या प्रकारानंतर आता पोलिसांनी धारचूलाचे काँग्रेस आमदार हरीश धामी यांच्यासह यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय इतर अज्ञात व्यक्तींविरुद्धही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

माईक बंद केल्याने संताप अनावर

भारत-तिबेट सीमेजवळील प्रसिद्ध 'जौलजीबी मेळ्या'चे उद्घाटन करण्यासाठी मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आले होते. या कार्यक्रमादरम्यान काँग्रेस आमदार हरीश धामी यांना व्यासपीठावरून भाषण करायचे होते; मात्र त्यांचा माईक बंद करण्यात आल्याने ते संतप्त झाले. रागाच्या भरात त्यांनी व्यासपीठावरूनच माईक फेकून दिला आणि खाली उतरून खुर्ची भिरकावली. यावेळी त्यांच्या समर्थकांनीही मंचावर तोडफोड केली. तसेच रागाच्या भरात त्‍यांनी असभ्य भाषेचा वापर केला. या घटनेमुळे उत्तराखंडमध्ये भाजप आणि काँग्रेसमधील राजकीय वाद चांगलाच पेटला आहे.

मुख्यमंत्र्यांमध्ये सत्य ऐकण्याची हिंमत नाही

या वादावर स्पष्टीकरण देताना आमदार हरीश धामी म्हणाले की, "हे सरकार भ्रष्टाचारी असून विरोधी पक्षाला घाबरले आहे. राज्यात झालेल्या भ्रष्टाचाराचे सत्य ऐकण्याची हिंमत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही. मी या मेळ्याचा अध्यक्ष आहे; परंतु अध्यक्ष असूनही मला बोलण्याची आणि स्थानिक नागरिकांच्या मागण्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्याची संधी दिली गेली नाही.

त्‍यांनी पुढे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यावर जोरदार निशाणा साधत त्यांना धारचूला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचे थेट आव्हान दिले. "जर काँग्रेस पक्षाने आदेश दिला, तर मी राज्यातील कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे आणि जनतेच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्र्यांचा पराभव करू शकतो," असा दावा धामी यांनी केला. दुसरीकडे, उत्तराखंड भाजपने काँग्रेस आमदाराच्या या आक्रमक आणि अशोभनीय वर्तनाचा तीव्र निषेध करत त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT