Uttarakhand | चमोलीत ढगफुटी; 10 जण बेपत्ता Pudhari File Photo
राष्ट्रीय

Uttarakhand | चमोलीत ढगफुटी; 10 जण बेपत्ता

राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाची माहिती

पुढारी वृत्तसेवा

चमोली; वृत्तसंस्था : उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत झालेल्या मालिकागत ढगफुटींनी हाहाकार माजवला. नंदनघाटी परिसरात केंद्रित झालेल्या या आपत्तीमुळे अनेक गावे जलमय झाली असून किमान 10 जण बेपत्ता झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

नंदनघाटी, सरपाणी, धुर्मा गावांत बेपत्ता कुटुंबे

नंदनघाटीतील कुंत्रिलगाफली येथे कुंवरसिंग (42), त्यांची पत्नी कोना देवी व मुलगे विकास आणि विशाल यासह दोन इतर ग्रामस्थ बेपत्ता आहेत. सरपाणी गावात 70 वर्षीय जगधाथा प्रसाद व त्यांची पत्नी भागा देवी यांचा मागमूस नाही. धुर्मा गावातील गुमानसिंग आणि ममता देवी यांचा संपर्कही तुटला आहे.

सेरा गावात पुन्हा विध्वंस; मोक्ष नदीने बदलला मार्ग

मोक्ष नदीच्या काठावर वसलेले सेरा गाव पुन्हा ढगफुटीच्या विळख्यात सापडले आहे. 8 जुलैच्या आपत्तीनंतर गाव पुनर्बांधणीच्या मार्गावर असतानाच पुन्हा एका विध्वंसक पावसाने घरे, शेती आणि दुकाने उद्ध्वस्त केली. महिपालसिंग व अवतारसिंग यांची घरे माती व ढिगार्‍याखाली दबली असून नदीच्या मार्ग बदलल्यामुळे परिसर पाण्याखाली गेला आहे. पेट्रोल पंपही चिखलात पुरला गेला आहे.

प्रशासनासमोर आव्हानात्मक बचावकार्य

वीजपुरवठा ठप्प, रस्ते वाहतुकीस अडथळे, मोबाईल नेटवर्क खंडित झाल्याने बाहेरील संपर्क तुटला आहे. अनेक ग्रामस्थ भीतीने जंगलात पळून गेले. जिल्हाधिकारी संदीप तिवारी यांच्याकडे तातडीच्या मदतीची मागणी पोहोचली आहे; मात्र कठीण भूभागामुळे मदतकार्यात विलंब होत आहे. अद्याप अधिकृत मृतांची संख्या जाहीर झालेली नसली तरी ग्रामस्थ तीव्र चिंता आणि भीतीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT