डेहराडून; वृत्तसंस्था : उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यात मंगळवारी सकाळी एक भीषण रस्ते अपघात झाला. द्वाराहाटहून रामनगरकडे जाणारी एक प्रवासी बस नियंत्रण सुटल्याने शेकडो फूट खोल दरीत कोसळली. यात सात जणांचा मृत्यू झाला असून, 11 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
19 प्रवासी असलेली ही बस भिकियासैंण परिसरातील सालापाणीजवळ आली असता चालकाचे नियंत्रण सुटले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, विनायक परिसर ओलांडल्यानंतर काही वेळातच ही दुर्घटना घडली. बस रस्त्यावरून घसरली आणि काही सेकंदांत खोल दरीत गायब झाली. तो आवाज अतिशय भयानक होता, असे एका स्थानिकाने सांगितले. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून बाधितांना सर्वतोपरी सरकारी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस आणि मदत पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरी खोल आणि दुर्गम असल्याने बचावकार्यात अडथळे येत होते. जखमींना तातडीने भिकियासैंण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, गंभीर जखमींना एअरलिफ्ट करून मोठ्या रुग्णालयात हलवण्याची व्यवस्था केली जात आहे.