राष्ट्रीय

Karnataka River Tragedy : कर्नाटकात काळाचा घाला! थट्टेहक्कल नदीपात्रात शिंपले गोळा करायला गेलेल्या ८ जणांचा बुडून मृत्यू

शिंपले गोळा करताना अचानक वाढले नदीचे पाणी; मृतांमध्ये ७ महिलांचा समावेश

पुढारी वृत्तसेवा

भटकळ (कारवार) : कर्नाटक राज्यातील कारवार जिल्ह्यातील भटकळ येथे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली आहे. थट्टेहक्कल नदीत शिंपले गोळा करण्यासाठी गेलेल्या १४ जणांपैकी ८ जणांचा दुर्दैवी अंत झाला आहे, तर दोन जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांमध्ये सात महिलांचा समावेश असल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

भटकळमधील शिराली येथील १४ जणांचा एक गट शिंपले गोळा करण्याच्या उद्देशाने थट्टेहक्कल नदीकाठी गेला होता. हे सर्वजण एकाच कुटुंबातील असल्याचे समजते. नदीपात्रात शिंपले गोळा करण्यात मग्न असतानाच, अचानक पाण्याची पातळी वाढली आणि प्रवाहाचा वेग प्रचंड वाढला. या अनपेक्षित पुरात हे सर्वजण वाहून गेले. ही घटना समोर येताच स्थानिक पातळीवर एकच खळबळ उडाली.

बचावकार्याला वेग

घटनेची माहिती मिळताच भटकळ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छिमार आणि बचाव पथकाच्या मदतीने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवण्यात आली. आतापर्यंत ८ जणांचे मृतदेह शोधण्यात यश आले असून, त्यांना उत्तरीय तपासणीसाठी भटकळ तालुका शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सुदैवाने, ४ जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे, मात्र आणखी दोघे बेपत्ता असल्याने त्यांच्या शोधासाठी बचावकार्य अद्याप सुरू आहे.

एकाच कुटुंबातील ८ जणांचा मृत्यू झाल्याने शिराली गाव शोकाकुल झाले आहे. नदीच्या पाण्याची पातळी अचानक कशी वाढली, याची अधिकृत चौकशी प्रशासनाकडून केली जात आहे. पोलीस आणि स्थानिक प्रशासन बेपत्ता असलेल्या दोघांचा कसून शोध घेत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT