पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यात मंगळवारी (दि.12) मातीचा मोठा ढिगारा कोसळल्याने चार महिलांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला माती गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. मोहनपुरा गावात त्यांच्या घरांचे डागडूजी करण्यासाठी आणलेल्या मातीचा ढिगारा अचानक कोसळला आणि त्यात अनेक महिला गाडल्या गेल्या.
कासगंजच्या जिल्हा दंडाधिकारी मेधा रूपम यांनी सांगितले की, एकूण नऊ महिलांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी चार महिलांना मृत घोषित करण्यात आले आहे. "नऊ महिलांना बाहेर काढण्यात आले आहे, त्यापैकी चार जणांना जिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले आहे. इतर जखमी आहेत. येथे बचावकार्य चांगल्या पद्धतीने पार पडले. जेसीबी आणि उत्खनन यंत्राच्या सहाय्याने संपूर्ण परिसराची तपासणी केली आहे. या ठिकाणी सध्या राष्ट्रीय महामार्गाचे काम चालू आहे.
"ज्या कोणाच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. महिला त्यांच्या घरासाठी माती आणण्यासाठी या ठिकाणी आल्या होत्या, असे सांगितले जात आहे. आम्ही महिलांशी बोलू," असेही जिल्हा दंडाधिकारी म्हणाल्या. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या दुःखद घटनेची दखल घेतली आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात नेण्याचे आणि त्यांच्यावर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत, अशा सूचनाही त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.