नवी दिल्ली : देशात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, बिहार आणि तामिळनाडू या ५ राज्यांमध्ये कर्करोगाचे प्रमाण जास्त आहे. सर्वाधिक रुग्ण उत्तर प्रदेशात तर दुसऱ्या क्रमांकाचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत, अशी माहिती केंद्र सरकारने दिली.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की, ३० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या लोकांची १००% तपासणी करण्यासाठी मंत्रालयाने २० फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान एक मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम देशभरात आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि इतर आरोग्य सुविधांमध्ये राबविली जाते. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रमाचा हवाला देत मंत्री प्रतापराव जाधव यांनी सर्वाधिक रुग्ण असलेल्या राज्यांची आकडेवारी सांगितली. त्यानुसार उत्तर प्रदेशात २,१०,९५८ रुग्ण, महाराष्ट्रात १,२१,७१७ रुग्ण, पश्चिम बंगालमध्ये १,१३,५८१ रुग्ण, बिहारमध्ये १,०९,२७४ रुग्ण आणि तामिळनाडूमध्ये ९३,५३६ रुग्ण आहेत. २०२५ मध्ये देशात कर्करोगाच्या रुग्णांची अंदाजे संख्या १५ लाख ६९ हजार ७९३ आहे आणि २०४० पर्यंत भारतात कर्करोगाचे रुग्ण २२ लाख १८ हजार ६९४ पर्यंत वाढण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले.