Uttar Pradesh Election 2027: ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहाहुल मुसलीमीन अर्थात AIMIM आणि आझाद समाज पार्टी (ASP) यंदाच्या उत्तर प्रदेश निवडणुकीत हात मिळवण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात या जरी दोन तुलनेनं छोट्या पार्टी असल्या तरी या दोन्ही एकत्र येण्याने समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांना मोठा धक्का देऊ शकतात. जर ओवैसींच्या एमआयएम आणि चंद्रशेखर आझाद यांच्या आझाद समाज पक्षाने हातमिळवणी केली तरी याचा फायदा भाजपला होऊ शकतो असे मत जाणकारांनी व्यक्त केलं आहे.
आझाद आणि ओवैसी यांच्या आघाडीची अधिकृत घोषणा आणि जागा वाटप या बाबतची घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात येणार आहे. ही पत्रकार परिषद लखनौ इथं गुरूवारी होण्याची शक्यता आहे. याबाबतची माहिती एआयएमआयएमचे प्रवक्ते शादाब चौहान यांनी दिली.
ते म्हणाले, 'ओवैसी आणि आझाद यांच्याकडून लखनौमध्ये १२ नोव्हेंबर रोजी संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी ते २०२७ च्या उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत एकत्र लढतील अशी घोषणा होण्याची शक्यता आहे.' चौहान यांनी जसजशी निवडणूक जवळ येईल तसतसे अजून काही छोटे पक्ष आमच्या आघाडीत येतील असा देखील दावा केला.
चौहान यांनी आमची आघाडी ही मुस्लिम आणि दलितांचा प्रभाव असलेल्या मतदार संघांना प्राधान्य देईल. यात पश्चिम उत्तर प्रदेश आणि रोहिलखंड भागाचा समावेश आहे.
चौहान म्हणाले की, 'आमचा मुख्य फोकस हा दलित आणि मुस्लिम यांच्यावर असणार आहे. कारण त्यांचेच सर्वाधिक शोषण झाले आहे. हे शोषण सर्व सरकारांनी केलं आहे. आमच्या आघाडीत कोण किती सीट लढणार याबाबतची घोषणा पत्रकार परिषदेत होणार आहे.
२०२५ मध्ये झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि आझाद समाज पक्षाने अपनी जनता पार्टीसोबत तिसरी आघाडी केली होती. या आघाडीने ६४ जागांवर आपले उमेदमवार उभे केले होते. एमआयएमने ३५, आझाद समाज पार्टीने २५ तर अपनी जनता पार्टीने ४ जागा लढवल्या होत्या.
एमआयएमने शेवटी २८ जागा लढवल्या. त्यातील ४ जागांवर विजय मिळवला. अमौर, बैसी, जोकीहाट, कोचाधमन आणि बहादूरगंज या जागांवर एमआयएम जिंकली होती. त्यांनी मुस्लिम बहुल सीमांचल भागात १.८५ ते १.९ टक्के मते मिळवली. तर आझाद समाज पार्टीने १८ जागा लवढल्या होत्या. त्यांना एकही जागा जिंकता आलेली नव्हती. त्यांना ०.२० ते ०.२१ टक्के मते मिळाली होती.