uttar pradesh allahabad baraipur raid house ground recovery three blue drums bundles rupee treasure
पुढारी ऑनलाईन : प्रयागराज : पुढारी ऑनलाईन निळ्या ड्रमचा उल्लेख होताच लोकांच्या मनात भीती निर्माण होते. मेरठमधील मुस्कानच्या निळ्या ड्रमशी संबंधित प्रकरणाबद्दल जवळपास सर्वांनाच माहिती आहे. मुस्कानने पतीची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह निळ्या ड्रममध्ये ठेवला होता. तेव्हापासून निळा ड्रम हा गुन्ह्याचे प्रतीक बनला आहे. आता प्रयागराजमध्येही पोलिसांना एक निळा ड्रम सापडला आहे. मात्र, यावेळी निळ्या ड्रममध्ये मृतदेह नव्हे, तर नोटांची बंडले आढळली आहेत.
नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरईपूर गावात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी एका घरावर छापा टाकून जमिनीखाली पुरलेले तीन निळे ड्रम जप्त केले. हे ड्रम उघडलले असता त्यामध्ये ५००-५०० रुपयांच्या नोटांची शेकडो बंडले भरलेली दिसून आली. निळ्या ड्रममध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्याने परिसरात खळबळ उडाली.
घरातील खोलीची जमीन खोदून ड्रम जप्त
हे संपूर्ण प्रकरण असे आहे की, बरई रामनगर गावात बुधवारी संध्याकाळी उशिरा मुंबई पोलीस आणि प्रयागराज पोलिसांच्या संयुक्त पथकाने राजेश यादव आणि राकेश यादव ऊर्फ महाकाल यांच्या घराला घेराव घालून झडती मोहीम सुरू केली. घरातील एका खोलीची जमीन खोदून पोलिसांनी तीन निळे ड्रम जप्त केले.
ड्रम उघडल्यावर त्यामध्ये ५००-५०० रुपयांच्या नोटांची बंडले भरलेली असल्याचे आढळले. जप्त करण्यात आलेली रक्कम चार ते पाच कोटी रुपये असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी गावातील चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. या घटनेची माहिती मिळताच एडीसीपी पुष्कर वर्मा यांच्यासह इतर अधिकारीही घटनास्थळी पोहोचले.
सध्या या प्रकरणाबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबई पोलीस एका गुन्हेगारी प्रकरणातील आरोपी राकेश यादव याला अटक करण्यासाठी आणि मुद्देमाल जप्त करण्यासाठी प्रयागराजमधील नवाबगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बरई रामनगर गावात आले होते.
दरम्यान, परिसरातील स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, राजेश यादवचा भाऊ बबलू यादव गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यात राहत होता. २०२० मध्ये कोरोना संसर्गाच्या काळात लॉकडाऊनदरम्यान तो गावात आला होता. त्यावेळी त्याच्यासोबत दोन मेहुणे आणि एक साडूही आले होते. प्राथमिक माहितीनुसार, जप्त करण्यात आलेली रक्कम त्यांच्यामार्फत आणण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
गंगानगरचे डीसीपी सोनम कुमार यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेली रक्कम ड्रमसह व्हिडिओग्राफी करून मालखान्यात ठेवण्यात आली आहे. संबंधित विभागांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. या पैशांचा खरा स्रोत काय आहे आणि ते घरात लपवून ठेवण्यामागील कारण काय आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या व्यक्तींची चौकशी सुरू असून, सर्व बाजूंनी तपास केला जात आहे.