Indian students US visa crisis visa rejection 2025 appointment slots India F1 visa rejection Drop in Indian students in US
नवी दिल्ली : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी एक गंभीर चिंता निर्माण झाली आहे. नवीन अहवालानुसार, यंदा भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत 70 ते 80 टक्क्यांनी घट झाली आहे. यामागचे मुख्य कारण म्हणजे व्हिसा अपॉईंटमेंट स्लॉट्स उपलब्ध न होणे, तसेच व्हिसा नाकारण्याच्या घटनांमध्ये झालेली मोठी वाढ, हे आहे.
दरम्यान, स्लॉट्स लवकरच खुले झाले नाहीत तर हजारो विद्यार्थ्यांची स्वप्ने भंगतील. त्यामुळे शिक्षणासाठी काही विद्यार्थी आता इतर पर्यायांचा शोध घेत असून अनेक विद्यार्थ्यांची पावले जर्मनीच्या दिशेने वळत असल्याचे समजते.
हैदराबादमधील विविध शिक्षण परामर्श केंद्रांनी सांगितले की, गेल्या काही वर्षांतील ही सर्वात वाईट स्थिती आहे. दरवर्षी या वेळेत बहुतेक विद्यार्थी व्हिसा मुलाखती पूर्ण करून उड्डाणासाठी तयारी करत असतात. पण यंदा विद्यार्थी दररोज पोर्टल रिफ्रेश करत आहेत – केवळ अपॉईंटमेंट स्लॉट्ससाठी.
ही स्थिती खूपच गोंधळाची आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी टप्प्याटप्प्याने स्लॉट्स उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते, पण अजून काहीच स्पष्ट नसल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
काही विद्यार्थ्यांना स्लॉट्स मिळाले तरी त्यांना अद्याप कोणतीही पुष्टी मिळालेली नाही. “स्लॉट्स ओपन होतात पण कन्फर्म होत नाहीत. हे प्रणाली तपासण्याचा भाग असू शकतो,” असेही काही तज्ञ्ज सांगताहेत.
या गोंधळामुळे अनेक विद्यार्थी आता जर्मनी, कॅनडा, ऑस्ट्रेलिया यांसारख्या पर्यायी देशांकडे वळत आहेत. एका २३ वर्षीय विद्यार्थ्याने सांगितले, “अधिक वेळ थांबू शकलो नाही. वर्ष वाया जाईल असे वाटते. म्हणून मी अर्ज मागे घेतला आणि आता जर्मनीत मास्टर्ससाठी अर्ज करत आहे.”
व्हिसासाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना “214(b)” कलमानुसार नकार दिला जात आहे. या कलमानुसार अर्जदाराने आपले मूळ देशाशी पुरेसे संबंध असल्याचे सिद्ध न केल्यास व्हिसा नाकारला जातो.
विशेष म्हणजे, अनेक विद्यार्थ्यांचे प्रोफाईल स्वच्छ असूनही त्यांना नकार मिळत आहे. हे नवीन नाही, पण यावेळी अंमलबजावणी अधिक तीव्रपणे होत आहे.
हैदराबादमधील अमेरिकन वाणिज्य दूतावासाने म्हटले आहे की, व्हिसा स्लॉट्स पुन्हा सुरु झाले आहेत आणि विद्यार्थ्यांनी नियमितपणे अधिकृत संकेतस्थळ तपासावे. “आम्ही अर्जदारांची पूर्ण पारख करत आहोत.
त्यांचे हेतू आणि व्हिसाच्या नियमांशी सुसंगततेची खात्री करत आहोत,” असे प्रवक्त्याने सांगितले.
गेल्या वर्षी भारताने चीनला मागे टाकत सर्वाधिक 3.3 लाख विद्यार्थी अमेरिकेत पाठवले होते. परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) आकडेवारीनुसार, 1 जानेवारी 2024 पर्यंत एकूण 11.6 लाख भारतीय विद्यार्थी परदेशी उच्च शिक्षण घेत होते. यामध्ये युरोपकडे वळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.