US museum returns Hindu idols to India
वॉशिंग्टन : तामिळनाडूतील मंदिरांमधून चोरून अमेरिकेत नेण्यात आलेल्या तीन अत्यंत दुर्मिळ आणि प्राचीन कांस्य मूर्ती अमेरिका भारत सरकारला परत करणार आहे. वॉशिंग्टन येथील 'स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ एशियन आर्ट'ने या मूर्तींच्या बेकायदेशीर तस्करीची कबुली देत त्या भारताकडे सुपूर्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या तिन्ही मूर्ती हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जातात.
या मूर्तींची चोरी कशी झाली, याचा शोध घेताना ऐतिहासिक पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरले. 'वॉशिंग्टन टाइम्स'च्या वृत्तानुसार, 'फ्रेंच इन्स्टिट्यूट ऑफ पॉंडिचेरी'कडे १९५० च्या दशकातील काही दुर्मिळ छायाचित्रे उपलब्ध होती. या फोटोंमध्ये या मूर्ती तामिळनाडूतील मंदिरांमध्ये असल्याचे स्पष्ट दिसत होते. भारतीय कायद्यानुसार हा चोरीचा ठोस पुरावा मानला गेला. भारतीय पुरातत्व विभागाने या पुराव्यांची सखोल तपासणी केल्यानंतर या मूर्तींची तस्करी झाल्याचे सिद्ध झाले.
१. शिव नटराज: १० व्या शतकातील (इ.स. ९९०) तंजावर येथील श्री भव औषधेश्वर मंदिरातील मूर्ती.
२. सोमास्कंद: १२ व्या शतकातील दुर्मिळ कांस्य मूर्ती.
३. संत सुंदरर आणि परवई: १६ व्या शतकातील प्राचीन कलाकृती.
तपासात समोर आले की, १९५६ ते १९५९ या काळात या मूर्ती तामिळनाडूतील मंदिरांमध्ये होत्या. भारतीय पुरातत्व विभागाने या मूर्ती भारतीय कायद्यांचे उल्लंघन करून देशाबाहेर नेण्यात आल्याचे मान्य केले. सध्या हे संग्रहालय आणि भारतीय दूतावास एकमेकांच्या संपर्कात असून, मूर्ती हस्तांतरण प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
यातील 'शिव नटराज' ही मूर्ती तंजावर जिल्ह्यातील तिरुथुराईपुंडी तालुक्यातील श्री भव औषधेश्वर मंदिरातील असल्याचे स्पष्ट झाले आहे. १९५७ मध्ये ही मूर्ती या मंदिरात असल्याचे छायाचित्रांवरून सिद्ध झाले. ही मूर्ती २००२ मध्ये न्यूयॉर्कमधील 'डोरिस विनर गॅलरी'कडून स्मिथसोनियन संग्रहालयाने खरेदी केली होती. संग्रहालयाच्या तपासात असे दिसून आले की, डोरिस विनर गॅलरीने विक्रीच्या वेळी दिलेली कागदपत्रे बनावट होती.