US-India Trade Deal | अमेरिका करार आराखड्यात भारतीय शेतकर्‍यांना संरक्षण 
राष्ट्रीय

US-India Trade Deal | अमेरिका करार आराखड्यात भारतीय शेतकर्‍यांना संरक्षण

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : भारत आणि अमेरिकेने अंतरिम व्यापार करारासाठी एक चौकट जाहीर केली असून, त्याअंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील प्रतिपूर्ती (रेसिप्रोकल) आयात शुल्क 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी केले आहे. संयुक्त निवेदनानुसार, भारताच्या कृषी बाजाराला पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. भारताने संवेदनशील मानल्या जाणार्‍या कृषी व दुग्धजन्य उत्पादनांवर कोणतीही आयात शुल्क सवलत दिलेली नाही.

केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे की, हा करार शेतकर्‍यांच्या हितांचे संरक्षण आणि ग्रामीण उपजीविकेचे संवर्धन करण्याबाबत भारताची ठाम बांधिलकी दर्शवतो. मका, गहू, तांदूळ, सोयाबीन, कुक्कुटपालन, दूध, चीज, इथेनॉल (इंधन), तंबाखू, काही भाज्या आणि मांस यांसह संवेदनशील कृषी व दुग्धजन्य उत्पादनांना पूर्ण संरक्षण देण्यात आले आहे. या अंतरिम करारामुळे व्यापक व्यापारी लाभ मिळत असले, तरी मुख्य अन्नधान्ये आणि शेतीशी संबंधित उत्पादनांना दिलेले संरक्षण हे स्पष्ट संकेत देतात की, भारत आपल्या ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या कणाकणाला तडजोडीच्या वाटेवर नेणार नाही. हा करार वस्त्रोद्योग, पादत्राणे, औषधे ते विमानांचे सुटे भाग अशा विविध भारतीय उत्पादनांवरील अमेरिकेचे परस्पर शुल्क 50 टक्क्यांवरून 18 टक्क्यांपर्यंत कमी करून भारतीय निर्यातीसाठी अमेरिकेचा मोठा बाजार खुला करतो.

करारात संरक्षण असलेली प्रमुख कृषी उत्पादने

मुख्य धान्ये (अन्नधान्ये)

खालील मूलभूत अन्नस्रोतांवर कोणतीही शुल्क कपात किंवा कोटा लागू होणार नाही. अमरंथ (राजगिरा), नाचणी (रागी), गहू, कोदो मिलेट, बार्नयार्ड मिलेट, मका, तांदूळ, बार्ली (जव), ज्वारी (सोरघम), बकव्हीट (कुटू), बाजरी, कांगणी (फॉक्सटेल मिलेट), ओटस्, न पॉलिश केलेली धान्ये, मैदा, तसेच गहू, मका, तांदूळ, बाजरी आदींचे पीठ.

दुग्धजन्य उत्पादने

लाखो लहान व अल्पभूधारक शेतकर्‍यांना रोजगार देणारा दुग्ध व्यवसाय पूर्णपणे संरक्षित ठेवण्यात आला आहे. दूध (द्रव, पावडर, केसिन), चीज (मोझरेला, ब्लू-व्हेन्ड, किसलेले/पावडर स्वरूपातील), क्रीम, बटर ऑईल, लोणी व तूप, दही, ताक, व्हे (दुधातील प्रथिने) उत्पादने

भाज्या व कडधान्ये

लहान शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणात पिकवल्या जाणार्‍या प्रमुख भाज्या व कडधान्यांवरही शुल्क सवलत दिलेली नाही. गोठवलेल्या भाज्या, बटाटे, वाटाणे, शेंगा, इतर कडधान्ये व भाज्या (सोललेल्या/न सोललेल्या), मिश्र गोठवलेल्या भाज्या, तात्पुरत्या जतन केलेल्या भाज्या, काकडी व घेरकिन्स, मशरूम (अगारिकस प्रकार), मिश्र जतन केलेल्या भाज्या

काही अमेरिकी उत्पादनांना प्रवेश

संवेदनशील उत्पादनांच्या आयातीपासून अंतर राखण्यात आले असले, तरी या अंतरिम करारामुळे भारतीय बाजारात काही अमेरिकन औद्योगिक व कृषी उत्पादने प्रवेश करू शकतील. यामध्ये डिस्टिलर्स ड्रायड ग्रेन्स, जनावरांच्या खाद्यासाठी लाल ज्वारी, सुकामेवा (ट्री नटस्), ताजी व प्रक्रिया केलेली फळे, सोयाबीन तेल, वाईन आणि मद्य यांचा समावेश आहे. हे शुल्क बदल व्यापारातील तणाव कमी करण्यासाठी आणि दोन्ही देशांतील बाजारपेठेत प्रवेश सुलभ करण्यासाठी करण्यात आलेल्या बांधिलकीचा भाग आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT