नवी दिल्ली : उत्तम वित्तीय स्थिती, स्थिर वेगाने होणारी चांगली आर्थिक वाढ, यामुळे अमेरिकेची पतमानांकन एजन्सी ‘फिच रेटिंग’ने भारताला ‘बीबीबी-’ मानांकन दिले आहे. अमेरिकेच्या शुल्कवाढीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला माफक झळ पोहोचण्याची शक्यता असली, तरी भारतीय अर्थव्यवस्था मजबूत राहणार असल्याचे ‘फिच’च्या अहवालात म्हटले आहे.
गत दोन वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीची गती मंदावली आहे. समकक्ष देशांमध्ये भारताची आर्थिक वाढ चांगली आहे. सरकारकडून पायाभूत सुविधांवर करण्यात येणारा भांडवली खर्च, स्थिर खासगी मागणी, यामुळे देशांतर्गत मागणी चांगली राहील, असेही ‘फिच’ने म्हटले आहे. खासगी गुंतवणुकीत मध्यम गतीने वाढ होईल.
महागाई घटल्याने भारतीय रिझर्व्ह बँकेला (आरबीआय) रेपो दरात पाव टक्का कपातीस वाव आहे. आरबीआयनुसार, महागाई निर्देशांकाची नीचांकी आणि महत्तम सुसह्य पातळी 2 ते 4 टक्के आहे. जुलै महिन्यात महागाई निर्देशांक 1.6 टक्क्यावर आला आहे. त्यामुळे कर्ज व्याज दरात कपात करता येऊ शकते.
देशाचा विदेशी गंगाजळीचा साठा डिसेंबर 2024 अखेरीस 636 अब्ज डॉलर होता. त्यात 15 ऑगस्ट 2025 अखेरीस 59 अब्ज डॉलरची भर पडली असून, एकूण गंगाजळी 695 अब्ज डॉलरवर गेली आहे. देशाची विदेशी गंगाजळीची गरज 8 महिने भागेल इतका हा साठा आहे.
व्यापार अनिश्चिततेमुळे व्यावसायिक गुंतवणुकीची मानसिकता प्रभावित होते. आशियामध्ये भारतावर सर्वाधिक आयात शुल्क लागू होईल. मात्र, चर्चेतून त्यात घट होऊ शकते, असे ‘फिच’ने म्हटले आहे. केंद्र सरकारने प्रस्तावित केलेली वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) श्रेणी लागू झाल्यास देशांतर्गत मागणी वाढेल, असेही ‘फिच’ने म्हटले आहे.