नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेचे भारतातील नवनियुक्त राजदूत सर्जिओ गोर यांनी सोमवारी पदभार स्वीकारला. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे ‘या शतकातील सर्वात महत्त्वाचे जागतिक धोरणात्मक संबंध’ असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.
अमेरिकन दूतावासात कर्मचार्यांना संबोधित करताना गोर म्हणाले की, अमेरिकेसाठी भारतापेक्षा महत्त्वाचा कोणताही भागीदार नाही. तसेच, दोन्ही देश एका मोठ्या व्यापारी कराराला अंतिम रूप देण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न करत आहेत.
व्यापारी कराराबाबत पुढील महत्त्वाची चर्चा मंगळवारी होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकसंख्या असलेला देश आहे, त्यामुळे हा करार पूर्णत्वास नेणे सोपे काम नाही. मात्र, आम्ही तो पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. व्यापार महत्त्वाचा आहेच; पण त्यासोबतच सुरक्षा, दहशतवाद विरोधी मोहीम, ऊर्जा, तंत्रज्ञान, शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांतही आम्ही एकत्र काम करत राहू, असे गोर यांनी सांगितले. पॅक्स सिलिका युतीमध्ये भारताचा समावेश यावेळी गोर यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. भारत पॅक्स सिलिका युतीचा सदस्य होणार आहे. ‘पुढच्या महिन्यात भारताला या गटात पूर्णवेळ सदस्य म्हणून आमंत्रित करण्यात येईल, हे सांगताना मला आनंद होत आहे,’ असे ते म्हणाले.
अमेरिकेचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी भारतावर केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर गोर यांनी स्पष्ट केले की, अमेरिका आणि भारत केवळ सामायिक हितसंबंधांनी जोडलेले नाहीत, तर हे संबंध सर्वोच्च पातळीवर द़ृढ आहेत. खरे मित्र एकमेकांशी असहमत असू शकतात. परंतु, ते नेहमी आपले मतभेद सोडवतात. मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासोबत जगभर प्रवास केला आहे आणि मी हे खात्रीने सांगू शकतो की, मोदींसोबतची त्यांची मैत्री पूर्णपणे खरी आहे.