जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर गोर यांनी काश्‍मीरबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. Pudhari
राष्ट्रीय

US Envoy in Kashmir | जम्मू आणि काश्मीर भारताचा महत्त्वाचा भाग : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांचे श्रीनगरमध्ये मोठे विधान

जम्मू-काश्मीरबाबतच्या भारताच्या दीर्घकालीन भूमिकेचे केले समर्थन

पुढारी वृत्तसेवा

US Ambassador Sergio Gor Kashmir Visit : जम्मू आणि काश्मीर भारताचा एक महत्त्वाचा भाग आहे, असे अमेरिकन राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी श्रीनगरच्या आपल्या पहिल्या भेटीदरम्यान स्‍पष्‍ट केले. केंद्र सरकारने कलम ३७० रद्द केल्यानंतर आणि पहलगाममधील हल्ल्यानंतर अमेरिकन राजदूतांनी जम्‍मू-काश्‍मीरला दिलेली ही पहिलीच भेट होती; या भेटीदरम्यान जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतल्यानंतर गोर यांनी हे महत्त्वपूर्ण विधान केले.पाकिस्तानकडून वारंवार होणाऱ्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर, जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे या भारताच्या भूमिकेला अमेरिकेच्या राजदूताच्या या विधानामुळे मोठा पाठिंबा मानला जात आहे.

"येथे येऊन आनंद झाला... हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग

सर्जिओ गोर म्‍हणाले की, "येथे येऊन आनंद झाला... हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. मी पहिल्यांदाच येथे आलो असून ही अत्यंत सुंदर जागा आहे." अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अत्यंत जवळचे मानले जाणारे सर्जिओ गोर यांनी जम्मू आणि काश्मीरसाठी लागू असलेल्या अमेरिकेच्या 'प्रवास प्रवासासंदर्भातील सूचनांविषयी' विचार करण्याचे संकेत दिले आहेत.

'लेव्हल ४ - प्रवास टाळा' याबाबत आम्ही विचार करू

सध्या अमेरिकेने सुरक्षेच्या कारणास्तव जम्मू-काश्मीरसाठी 'लेव्हल ४ - प्रवास टाळा' असा इशारा दिलेला आहे.याविषयी बोलताना गोर म्हणाले, "अमेरिकेकडून देण्यात आलेला हा प्रवास टाळण्याचा इशारा मागे घेता येईल का किंवा तो कमी करता येईल का, यावर आम्ही विचार करू. या प्रदेशातील सुरक्षा वाढवण्यासाठी आणि परिसर अधिक सुरक्षित करण्यासाठी अत्यंत उल्लेखनीय पावले उचलण्यात आली आहेत."

काश्मीरच्या आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर केलेल्या एका पोस्टमध्ये गोर यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत काश्मीरच्या विकासाचे प्राधान्यक्रम आणि आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भर देण्यात आला. "आम्ही आर्थिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या आणि दोन्ही देशांना परस्पर फायदेशीर ठरतील अशा संधी निर्माण करण्याच्या मार्गांवर चर्चा केली," असे त्यांनी नमूद केले.

सर्जिओ गोर लडाख दौऱ्यावर जाणार

उपराज्यपालांची भेट घेतल्यानंतर सर्जिओ गोर लडाख दौऱ्यावर जाणार आहेत. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर सात वर्षांनी होत असलेल्या या उच्चस्तरीय दौऱ्याला मोठे राजकीय आणि मुत्सद्दी महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) असंतोष उफाळून आला असताना हा दौरा होत आहे.

अमेरिकेच्या राजदूताचा काश्मीर दौरा का महत्त्वाचा?

भारत आणि अमेरिका यांच्यातील दृढ होत जाणारे धोरणात्मक संबंध आणि दहशतवादविरोधी कारवाईच्या मुद्द्यावर नुकतीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी झालेली चर्चा या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. गेल्या १५ वर्षांहून अधिक काळात अमेरिकेचे सध्या कार्यरत असलेले राजदूत आणि जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांमध्ये झालेली ही पहिलीच भेट आहे. यापूर्वी २०११ मध्ये अमेरिकेचे तत्कालीन राजदूत टिमोथी रोमर यांनी ओमर अब्दुल्ला यांची भेट घेतली होती. : यापूर्वी २०१८ मध्ये पीडीपी-भाजप सरकार कोसळल्यानंतर तत्कालीन राजदूत केनेथ जस्टर यांनी काश्मीरचा दौरा केला होता. त्यानंतर आता अमेरिकेचे राजदूत आणि जम्मू-काश्मीर सरकारमध्ये थेट संवादाची सुरुवात झाली आहे.

'वॉशिंग्टन आपल्या समस्या सोडवणार नाही' : ओमर अब्दुल्ला

या दौऱ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या भेटीबाबत अतिरिक्त उत्साह दाखवणे टाळले. अमेरिकेच्या राजदूताकडे आपण काश्मीरबाबत कोणतीही तक्रार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नॅशनल कॉन्फरन्स पक्ष सत्तेत आल्यापासून अब्दुल्ला हे जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत."वॉशिंग्टन आपल्या समस्या सोडवणार नाही, तर केंद्र सरकारच त्या सोडवेल. तक्रारी करत बसण्यापेक्षा मी त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याला प्राधान्य देईन," असे ओमर अब्दुल्ला यांनी माध्‍यमांशी बोलताना स्‍पष्‍ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT