Urea, DAP  
राष्ट्रीय

Urea, DAP Available | शेतकऱ्यांनो घाबरु नका! खरीप हंगामापूर्वी देशात मुबलक खतसाठा; केंद्र सरकारचे स्पष्टीकरण!

पश्चिम आशियातील तणावामुळे देशांतर्गत उत्‍पादनात तात्‍पुरता अडथळा, मात्र तुटवडा भासणार नाही याचा विश्चास

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर देशात युरिया आणि डीएपी (डायअॅमोनियम फॉस्फेट) खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती केंद्र सरकारने सोमवारी दिली. पश्चिम आशियातील तणावामुळे देशांतर्गत उत्पादनात तात्पुरता अडथळा निर्माण झाला असला तरी शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही, असा विश्वास सरकारने व्यक्त केला.

केंद्र सरकारच्या खत विभागाच्या संयुक्त सचिव अपर्णा एस. शर्मा यांनी आंतर-मंत्रालयीन पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, युरिया ४५ किलोच्या पिशवीसाठी २६६ रुपये तर डीएपी ५० किलोच्या पिशवीसाठी १,३५० रुपये या नियंत्रीत दरात शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे.

जागतिक बाजारपेठेत खतांच्या किमतीत मोठी वाढ झाली असून वाहतूक खर्चही वाढला आहे. अमोनिया, गंधक आणि सल्फ्युरिक आम्ल यांसारख्या महत्त्वाच्या घटकांच्या किमतीतही वाढ झाल्याने देशांतर्गत उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे युरिया उत्पादनात सुरुवातीला दररोज सुमारे ३०,००० ते ३५,००० टनांची घट झाली होती.

खरीप हंगामासाठी खतांची एकूण गरज सुमारे ३९० लाख टन असल्याचा अंदाज असून, गेल्या वर्षी याच कालावधीत ३६१ लाख टन खतांची विक्री झाली होती. सध्या देशात १८० लाख टन खतसाठा उपलब्ध असून, गेल्या वर्षीच्या १४७ लाख टनांच्या तुलनेत हा साठा अधिक आहे. गॅसपुरवठा जो पूर्वी ६० टक्क्यांपर्यंत घटला होता, तो आता हळूहळू सुधारत ८० टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे उत्पादनातही सुधारणा होत आहे.

पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सरकारने प्रमुख पुरवठादारांशी सतत संपर्क ठेवला आहे. तसेच खाडी देशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी रशिया, मोरोक्को, ऑस्ट्रेलिया, इंडोनेशिया, मलेशिया, जॉर्डन, कॅनडा, अल्जेरिया, इजिप्त आणि टोगो यांसारख्या देशांकडून खतपुरवठा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचेही शर्मा यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT