रायपूर : बंदी घातलेल्या सीपीआय (माओवादी) संघटनेचे सक्रिय सदस्य असलेले जग्गू कुरसाम ऊर्फ रमेश (वय 28) आणि त्याची पत्नी कमला (27) यांना छत्तीसगडच्या रायपूर शहरातून अटक करण्यात आली. बस्तरमधील सहाहून अधिक विभागीय समित्यांशी संबंधित असूनही, या दोघांनी अनेक वर्षे राजधानी रायपूरमध्ये आपली खरी ओळख गुप्त ठेवली होती.
केंद्रीय गुप्तचर यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे राज्याच्या गुप्तचर पथकाने या नक्षलवादी दाम्पत्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले होते. काही दिवसांपूर्वीच वरिष्ठ माओवादी नेत्याला केलेला त्यांचा फोन कॉल पकडल्यामुळे ते पाळतीखाली होते. या दोघांवर 13 लाख रुपयांचे बक्षीस होते, अशी माहिती एका पोलीस अधिकार्याने दिली. रमेश हा नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य होता, तो रायपूरमध्ये सरकारी अधिकार्यांच्या घरी सुरक्षा रक्षक आणि चालक म्हणून काम करत होता.