नवी दिल्ली : काँग्रेसच्या सततच्या हल्ल्यांदरम्यान केंद्र सरकारने गांधी कुटुंबाला मोठा धक्का देण्याची तयारी सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय शहरी आणि गृहनिर्माण मंत्रालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागेचा शोध सुरू केला आहे.
केंद्र सरकार जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, संजय गांधी आणि राजीव गांधी यांच्या स्मारकांच्या शेजारी मनमोहन सिंग यांच्या स्मारकासाठी जागा देण्याच्या प्रयत्नात आहे. मनमोहन सिंग यांचे स्मारक माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या शक्तिस्थळाजवळ, राजीव गांधींचे स्मारक वीरभूमी आणि संजय गांधी यांच्या स्मारक यापैकी एका ठिकाणी असू शकते. मात्र मनमोहन सिंग यांच्या स्मृतिस्थळासंदर्भात आणखी काही ठिकाणांचाही उल्लेख केला जात आहे. केंद्रीय नागरी गृहनिर्माण मंत्रालयाने राष्ट्रीय स्मारक स्थळ आणि किसान घाटाजवळील जागेलाही भेट दिली आहे. पण, शक्तिस्थळ आणि वीरभूमीजवळ अधिक जमीन असल्याने मनमोहन सिंग यांचे स्मारक तेथेच उभारण्याची शक्यता दिसते.
केंद्र सरकारने शक्तिस्थळ, वीरभूमी किंवा संजय गांधींच्या समाधी स्थळाजवळ डॉ. मनमोहन सिंग यांचे स्मारक उभारल्यास गांधी कुटुंब अस्वस्थ होऊ शकते. कारण जिथे त्यांच्या कुटुंबीयांचे स्मारक असेल, तिथे देशातील अन्य व्यक्तिमत्त्वाच्या स्मारकासाठी जागा दिली जाऊ नये, अशीच त्यांची इच्छा असणार. त्यामुळे या निर्णयाने काँग्रेसला विशेषतः गांधी परिवाराला भाजप धक्का देऊ शकते.