UPI Payments | आता इंटरनेट नसले तरीही होणार यूपीआय पेमेंट File Photo
राष्ट्रीय

UPI Payments | आता इंटरनेट नसले तरीही होणार यूपीआय पेमेंट

देशातील २० कोटींहून अधिक फीचर फोन वापरकर्त्यांना होणार फायदा

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : विनाइंटरनेट युनिफाईड पेमेंट इंटरफेस अर्थात यूपीआय पेमेंट शक्य होणार आहे. फोन पेने सोमवारी यूपीआय १२३ पे ही नवीन सेवा सुरू केली आहे. त्यामुळे केवळ फोन, एसएमएस अशी प्राथमिक सुविधा असलेल्या फीचर फोन वापरणाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

देशामध्ये प्राथमिक फोन वापरणाऱ्यांची संख्या २० कोटींहून अधिक आहे. स्मार्टफोन न वापरणाऱ्यांनाही डिजिटल पेमेंट करता यावे, यासाठी ही सेवा सुरू करण्यात आली आहे. अशी सेवा आणणारी फोन पे ही देशातील पहिली यूपीआय पुरवठादार कंपनी ठरली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागामध्ये डिजिटल पेमेंटचा प्रसार करण्यासाठी ही सेवा फायदेशीर ठरेल. देशातील अनेक दुर्गम भागात मोबाईलला नेटवर्क नसते. अशावेळी यूपीआय पेमेंट कुचकामी ठरते. या सेवेमुळे इंटरनेट सुविधेचा अडथळा दूर झाला आहे.

ही सेवा अशा भागांतही काम करण्यासाठी तयार करण्यात आली आहे, जिथे टू जी कनेक्टिव्हिटी मर्यादित आहे. वापरकर्ते मोबाईल नंबर किंवा यूपीआय आयडी वापरून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला पेमेंट करू शकतात, तसेच यूपीआय आयडी आणि क्यूआर कोडद्वारे व्यापाऱ्याला पेमेंट करू शकतात. फीचर फोन वापरकर्ते या सेवेद्वारे त्यांच्या बँक खात्यातील शिल्लक रक्कम (बॅलन्स) तपासू शकतील. तसेच व्यवहारांचा इतिहास (ट्रान्झॅक्शन हिस्ट्री) पाहू शकतील.

या फोनला चालेल ऑफलाईन यूपीआय

फोनपे यूपीआय १२३ पे हे फीचर नोकिया, एचएमडी, लावा इंटरनॅशनल आणि आयटेल मोबाईलवर ही सेवा उपलब्ध असेल. आगामी महिन्यांत आणखी काही हँडसेट उत्पादकांसोबत भागीदारी करण्याची कंपनीची योजना आहे. भविष्यात बिल पेमेंट, मोबाईल रिचार्ज आणि आधार आधारित यूपीआय ऑनबोर्डिंग यांसारख्या वैशिष्ट्यांचाही यात समावेश केला जाईल.

अशी करा नोंदणी

वापरकर्ते स्मार्टफोन किंवा इंटरनेट कनेक्शनचा वापर न करता, थेट ॲप आधीच दिलेल्या फीचर फोनवर या सेवेसाठी नोंदणी करू शकतात. फीचर फोनवर आधीपासून इन्स्टॉल केलेले फोनपे ॲप उघडा. डिव्हाईसची नोंदणी पूर्ण करण्यासाठी अटी आणि शर्ती वाचा आणि त्या स्वीकारा. यादीतून वापरकर्त्याची बँक निवडा. डेबिट कार्डचे शेवटचे सहा अंक आणि त्याची एक्सपायरी डेट (मुदत संपण्याची तारीख) नोंदवा. यूपीआय पिन सेट करा. एकदा यूपीआय पिन सेट झाला की, यूपीआय आयडी सक्रिय होतो.

असे करा पेमेंट

फीचर फोन ॲपद्वारे स्कॅन अँड पे, कॉन्टॅक्टस्‌, मोबाईल नंबर्स आणि यूपीआय आयडी यांसारख्या अनेक पेमेंट पर्यायांचा वापर करू शकतात. पे टू मोबाईल नंबर किंवा पे टू यूपीआय आयडी हा पर्याय निवडा. ज्याला पैसे पाठवायचे आहेत, त्यांचा मोबाईल नंबर किंवा यूपीआय आयडी नोंदवा. रक्कम आणि यूपीआय पिन टाईप केल्यावर पेमेंटची पुष्टी करण्यासाठी ओके बटणवर क्लिक केल्यास पेमेंट पूर्ण होईल. ‘स्कॅन अँड पे’ पर्यायाचा वापर करून क्यूआर कोड स्कॅन करूनही पेमेंट करू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT