UPI Credit Line
नवी दिल्ली : अचानक दवाखान्याचा खर्च आला किंवा इतर कोणती आर्थीक अडचण आली तर सामान्य लोकांना खासगी सावकारांकडे हात पसरावे लागतात. अथवा मित्र किंवा नातेवाईकांचा आधार घ्यावा लागतो. पण आता अचानक लहान कोणता खर्च आला आणि खात्यावर पैसे नसतील तरी तुम्हाला काही क्षणात UPI वापरून पेमेंट करता येईल. गेल्या काही काळापासून UPI क्रेडिट लाईन चर्चेत आहे. UPI क्रेडिट लाईनच्या मदतीने, ग्राहक खात्यात पैसे शिल्लक नसतानाही UPI वापरून पैसे देऊ शकतील.
एका अहवालानुसार, अॅक्सिस बँक, HDFC बँक आणि कोटक महिंद्रा बँक सारख्या प्रमुख खासगी बँका ही सेवा सुरू करण्याची तयारी करत आहेत. UPI क्रेडिट लाईन म्हणजे काय आणि त्याचा सामान्य माणूस आणि बँक दोघांनाही कसा फायदा होईल ते जाणून घ्या.
UPI क्रेडिट लाइन ही एक प्रकारची 'डिजिटल कर्ज सुविधा' आहे. बँक आपल्या ग्राहकांना त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलनुसार एक निश्चित रक्कम कर्ज म्हणून उपलब्ध करून देईल. या सुविधेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, खात्यात शून्य रुपये शिल्लक असतानाही ग्राहक या क्रेडिट मर्यादेचा वापर करून कोणालाही UPI पेमेंट करू शकतील. वापरलेली रक्कम नंतर ग्राहकाला निश्चित कालावधीत व्याजासह बँकेला परत करावी लागेल. ही सुविधा अगदी क्रेडिट कार्डसारखीच आहे, पण यासाठी वेगळ्या कार्डची गरज नाही; तुम्ही थेट UPI ॲपद्वारेच वापर करू शकता. NPCI ने सप्टेंबर २०२३ मध्ये ती लाँच केली आणि आता पहिल्यांदाच मोठ्या बँका ती मोठ्या प्रमाणात राबवत आहेत.
ही नवीन सुविधा सामान्य लोकांना खूप मदत करू शकते. अचानक येणारा वैद्यकीय खर्च, ऑनलाइन तिकीट बुकिंग किंवा अचानक येणाऱ्या इतर खर्चासाठी त्वरित पैसे उपलब्ध होतील. १,००० ते २०,००० रूपयांर्यंतच्या लहान क्रेडिट रकमा सहज उपलब्ध होतील. यासाठी क्रेडिट कार्ड वापरण्याची गरज नाही; थेट UPI ॲपमधून व्यवहार करता येईल. वेळेवर कर्जाची परतफेड केल्यास तुमचा क्रेडिट स्कोअर (CIBIL) सुधारेल, ज्यामुळे भविष्यात मोठे आणि स्वस्त कर्ज मिळेल.
ही सुविधा बँकांसाठी नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा एक सोपा मार्ग आहे. क्रेडिट कार्ड नसलेल्यांनाही या क्रेडिट लाईनचा फायदा होईल. वेळेवर लहान कर्ज फेडणारे ग्राहक भविष्यात विश्वासार्ह आणि महत्त्वाचे ग्राहक बनू शकतात.
बँका गेल्या काही काळापासून या नवीन फीचरचा विचार करत आहेत. व्याजदर कसा ठरवला जाईल, व्याजमुक्त कालावधी असेल का आणि लहान कर्जे कशी वसूल केली जातील याबद्दल त्यांना चिंता होती. आता, आरबीआय आणि एनपीसीआयने नियम स्पष्ट केले आहेत. परिणामी, एचडीएफसी आणि अॅक्सिस सारख्या प्रमुख बँका फिनटेक कंपन्यांच्या सहकार्याने ते सुरू करण्याची तयारी करत आहेत.
यूपीआय क्रेडिट लाइन ही केवळ एक नवीन सुविधा नाही, तर डिजिटल पेमेंट सिस्टममधील पुढचा मोठा बदल आहे. तज्ज्ञांच्या मते, येत्या काही महिन्यांत UPI क्रेडिट लाइन आपल्या रोजच्या खर्चाचा आणि आर्थिक व्यवहारांचा एक अविभाज्य भाग बनू शकते.